विराटच्या 'या' ग्लोजची किंमत तब्बल 3.20 लाख रुपये! एवढ्या किंमतीमागील कारण जाणून घ्या

Virat Kohli Batting Gloves Price: विराट कोहलीने अनेकदा आपल्या दमदार खेळीने विरोधकांना पाणी पाजलं आहे. विराटचा मोठा चाहता वर्ग जगभरात असून नुकताच याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 19, 2023, 09:48 AM IST
विराटच्या 'या' ग्लोजची किंमत तब्बल 3.20 लाख रुपये! एवढ्या किंमतीमागील कारण जाणून घ्या title=
विराटने अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला

Virat Kohli Batting Gloves Price: भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या 'सुपर-4' सामन्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली. याच खेळीच्या जोरावर भारताला 'करो या मरो'च्या सामन्यात पाकिस्तानवर 238 धावांनी विजय मिळवता आला. विराटने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांच अशी कामगिरी केलेली नाही. यापूर्वीही त्याने अनेकदा पाकिस्तानविरुद्धचे सामने जिंकून दिलेले आहेत. विराटच्या या पाकिस्तानविरुद्धच्या खेळींची क्रेझ किती आहे याचा प्रत्यय नुकताच आला.

ते 2 भन्नाट षटकार 

2022 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये मेलबर्न येथील सामन्यामधील विराट कोहलीची खेळी आजही अनेकांच्या लक्षात आहे. धावांचा पाठलाग करताना अशक्य वाटणारं लक्ष्य विराटने 53 चेंडूंमध्ये केलेल्या नाबाद 82 धावांमुळे सहज शक्य झालं होतं. या खेळीमध्ये विराटने मोक्याच्या क्षणी लगावलेले 2 षटकार आजही अनेकांच्या दृष्टीपटलांसमोर जसेच्या तसे उभे राहतात. याच खेळीदरम्यान विराटने वापरलेल्या बॅटिंग ग्लोजचा नुकताच लिलाव झाला. या लिलावामध्ये या ग्लोजला फार मोठी बोली मिळाली.

विराटची अविस्मरणीय खेळी

विराटने पाकिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकवला होता. वर्ल्डकप 2022 च्या ग्रुप-2 मधील या सामन्यामध्ये पाकिस्तानने 159 धावांच्या मोबदल्यात 8 गडी असा स्कोअर आपल्या 20 ओव्हरमध्ये केला होता. या धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्येच भारताने 3 गडी गमावले. अक्सर पटेलला हार्दिक पंड्याच्या आधी पाठवण्यात आलं पण तो ही लवकर तंबूत परतला. अखेर हार्दिक पंड्या आणि विराटने केलेल्या 113 धावांच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. हार्दिकही शेवटच्या ओव्हरमध्ये बाद झाला. मात्र विराटने शेवटपर्यंत नाबाद राहत भारताला हा सामना 4 विकेट्सने जिंकून दिला. याच सामन्यातील विराटने वापरलेल्या ग्लोजचा लिलाव करण्यात आला.

किती रुपयांना झाला या ग्लोजचा लिलावा

चॅपल फाऊंडेशन वार्षिक स्नेहभोजन कार्यक्रमामध्ये विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये वापरलेल्या ग्लोजचा लिलाव झाला. लिलावामध्ये विराटच्या या वापरलेल्या ग्लोजसाठी तब्बल 3.20 लाखांची बोली लागली. हार्व क्लेरने हे ग्लोज एवढ्या मोठ्या रक्कमेला विकत घेतले. यासंदर्भातील वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

या पैशांचं काय करणार?

13 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे हा लिलावाचा कार्यक्रम पार पडला. भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि ऑस्ट्रेलियातील उद्योजक दक्शा मेहता यांनी एकत्र येऊन चॅपेल फाऊंडेशनची स्थापना केली आहे. ऑस्ट्रेलियातील बेघर लोकांसाठी पैसे गोळा करण्याचं काम ही संस्था करते. गरीबांसाठी घरांची, आरोग्यासंदर्भातील सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण देण्याचं काम या पैशांमधून केलं जातं. कोहलीने स्वत: हे ग्लोज आपल्या खेळीनंतर या संस्थेला दान केले होते. याच ग्लोजचा लिलाव करुन आता निधी उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ब्रेट ली, मायकल बिव्हॅन, जॉफ लॉसन, फिल एमरे, जॉर्ज डायर, इयन चॅपेल सारखे दिग्गज खेळाडू सिडनी क्रिकेट गाऊण्डवर पार पडलेल्या या वार्षिक कार्यक्रमाला उपस्थित होते.