नाराज झालेल्या विराटने नाही घातली ऑरेंज कॅप...हे आहे नाराजीचे कारण

मंगळवारी विराट कोहलीच्या बंगळूरु संघाला मुंबईकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. 

Updated: Apr 18, 2018, 01:06 PM IST
नाराज झालेल्या विराटने नाही घातली ऑरेंज कॅप...हे आहे नाराजीचे कारण

मुंबई : मंगळवारी विराट कोहलीच्या बंगळूरु संघाला मुंबईकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१४ धावा केल्या. त्यानंतर बंगळूरुला ४६ धावांनी हरवले. बंगळूरुकडून विराटने एकट्याने ९२ धावांची नाबाद खेळी केली मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. 

विराटच्या या जबरदस्त खेळीमुळे विराटला ऑरेंज कॅप देण्यात आली. आपल्या ९२ धावांच्या जोरावर विराटचा या स्पर्धेतील २०१ धावा झाल्यात. ज्यात ७ षटकार आणि १९ चौकारांचा समावेश आहे. विराटला यामुळे ऑरेंज कॅप मिळाली. मात्र विराटने ती घालण्यास नकार दिला. विराट रागात होता. १९व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याला पहिल्यांदा अंपायरने आऊट दिले. त्यानंतर मुंबईने रिव्ह्यू घेतला. इथपर्यंत ठीक होते मात्र जेव्हा स्क्रीनवर चेंडू बॅटला लागून गेल्याचे दिसत असतानाही थर्ड अंपायरने नॉट आऊट म्हटल्याने विराटला राग आला.

यानंतर विराट स्वत: सलामीला उतरला. त्याला संघाला काही करुन जिंकवायचे होते. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. यामुळे विराट अधिकच निराश होत गेला. 

ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी वाटतेय

सामना संपल्यानंतर जेव्हा विराटला ऑरेंज कॅप देण्यात आली तेव्हा रागाने ही कॅप फेकून द्यावीशी वाटतेय असे म्हटले. मला ही कॅप घालायची नाहीये. ही कॅप फेकून द्यावीशी वाटतेय. सध्या आम्ही कशा विकेट गमावल्या यावर फोकस करायचे आहे.