मै झुक गया साला...! सूर्यकुमारच्या झुंजार खेळीसमोर विराट झुकलाच....

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो ठरला. 

Updated: Sep 1, 2022, 11:10 AM IST
मै झुक गया साला...! सूर्यकुमारच्या झुंजार खेळीसमोर विराट झुकलाच.... title=

दुबई : टीम इंडियाने आशिया कपच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियनाने हाँगकाँगचा 40 रन्सने पराभव केला. भारताने पहिल्या सामन्यातही पाकिस्तानला पाच विकेट्सने धुव्वा उडवला. आता पाकिस्तानी टीमने त्यांच्या पुढच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव केला तर रविवारी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

विराट झाला सूर्याचा फॅन

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमार यादवने अवघ्या 26 बॉल्समध्ये नाबाद 64 रन्स केले. यादरम्यान त्याने सहा सिक्स आणि तब्बल चौकार मारले. यातील चार सिक्स सूर्यकुमारने डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मारले. स्टार फलंदाज विराट कोहलीने सूर्याला चांगली साथ दिली. कोहली आणि सूर्या यांनी तिसऱ्या विकेटसाठी 98 रन्सची नाबाद पार्टनरशीप केली.

सूर्यकुमार यादवची झंझावाती फलंदाजी पाहून विराट कोहलीही चांगलाच प्रभावित झाला. भारताचा डाव संपल्यानंतर सूर्यकुमार यादव डगआऊटमध्ये परतत असताना कोहलीने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं मन जिंकलं. यावेळी कोहलीने छातीवर हात ठेवत सूर्याला नतमस्तक केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सूर्या-कोहली यांच्यात ठसन

2020 च्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादव आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली यांच्यात विचित्र प्रसंग निर्माण झाला होता. त्या सामन्यात विराट कोहलीला स्लेजिंग केल्यानंतर सूर्यकुमारने त्याच्याकडे रोखून पाहिलं होतं. सूर्याची ही प्रतिक्रिया खूप चर्चेचा विषय ठरली. 

त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 164 रन्स केले. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवने कठीण परिस्थितीत 43 चेंडूत नाबाद 79 रन्स करत मुंबईला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी या दोघांमध्ये ही चकमक झाली होती.