नवी दिल्ली : यावर्षी लगातार वेगवेगळे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याचा विराट कोहली याने धडाकाच लावला आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या श्रीलंके विरूद्धच्या तिस-या आणि शेवटच्या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी विराटच्या नावावर आणखी एक कारनामा जमा झालाय.
तिस-या टेस्टच्या चौथ्या दिवशी ५० रन्सची खेळी करत तीन सीरिजमध्ये ६०० पेक्षा जास्त रन्स करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. कोहलीने श्रीलंकेसोबत सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये एकूण ६१० रन्स केले आहेत. यासोबतच कोहलीने २०१६-१७ सत्रात इंग्लंड विरूद्ध ६५५ आणि २०१४-१५ सत्रात ऑस्ट्रेलिया विरूद्ध ६९२ रन्स केले आहेत.
श्रीलंके विरूद्ध सध्या सुरू असलेल्या तीन टेस्टच्या पाच खेळीमध्ये विराटने एकदा नाबाद राहून एकूण ६१० रन्सचा आकडा पार केला. कोहलीने कोलकाता टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट होऊनही दुस-या इनिंगमद्ये १०४ रन्सची नाबाद खेळी केली. त्यानंतर नागपूरमध्ये त्याने २१३ रन्स केले. दिल्ली टेस्टमध्ये कोहलीने पहिल्या इनिंगमध्ये २४३ रन्सची जबरदस्त खेळी केली आणि लागोपाठ तीन दुहेरी शतकं लगावणारा पहिला कर्णधार बनला. त्यानंतर दुस-या इनिंगमध्ये कोहलीने ५० रन्सची खेळी केली. या सीरिजमध्ये कोहलीने ८२.२१ च्या स्ट्राईक रेटने ५७ फोर आणि चार सिक्सर लगावले.
कोहलीने पहिल्यांदा एका सीरिजमध्ये ६०० पेक्षा जास्त रन्स करण्याचा कारनामा २०१४ मध्ये केला होता. ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या चार सामन्यांच्या सीरिजमध्ये कोहलीने आठ खेळींमध्ये ८६.५० च्या सरासरीने एकूण ६९२ रन्स केले होते. या सीरिजमध्ये कोहलीने चार शतकं आणि एक अर्धशतक लगावलं होतं. या सीरिजमध्ये कोहलीने ७७ फोर आणि एक सिक्सर लगावला होता.