नवी दिल्ली : साऊथ आफ्रिका दौ-यानंतर टीम इंडिया पुन्हा श्रीलंका दौ-यावर जाणार आहे. पुढील महिन्यात सहा ते १८ मार्च दरम्यान श्रीलंकेत त्रिकोणीय टी-२० सीरिज होणार आहे.
यासाठी टीमची निवड करण्यासाठी निवड समितीची बैठक होणार आहे. यात गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्याबद्दलही निर्णय होण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीने साऊथ आफ्रिकेत सर्वच सामने खेळले. त्याच्याबाबत बीसीसीआयच्या एका अधिका-यांनी सांगितले की, ‘जर विराटला विश्रांती घ्यायची असेल तर मिळेल. विराट त्याबाबतीत स्वत: निर्णय घेऊ शकतो. पण आपण काही निश्चित सांगू शकत नाही. कारण ही टी-२० सीरिज या सत्रातील शेवटचं टुर्नामेंट आहे. त्यानंतर लगेच आयपीएल सुरू होण्याआधी त्याच्याकडे १५ दिवसांचा वेळ असेल’.
जेव्हा निवड समितीचे मुख्य प्रसाद यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी बोलण्यास नकार दिल. पण अर्थातच बैठकीत गोलंदाजांवरही चर्चा होणार आहे. भुवी आणि बुमराह यांना आयपीएल सुरू होण्याआधीच्या लांब सीझनकडे बघता विश्रांती दिली जाऊ शकते. हे दोघेही टीम इंडियाच्या सर्वच फॉर्मॅटमध्ये शानदार प्रदर्शन करत आले आहेत.
भुवनेश्वरने टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये १०० ओव्हर टाकले आहेत. जर त्याने नियोजित पूर्ण ओव्हर टाकले असते तर हा आकडा ११२ इतका झाला असता. पण कुणीही बुमराह इतकी गोलंदाजी केली नाहीये. जर बुमराह तीन टी-२० मध्ये आपले पूर्ण ओव्हर्स टाकणार असेल तर त्याचे एकूण १६६ ओव्हर्स होतील.
टीम इंडियाला येणा-या सीझनामध्ये ३० वनडे सहीत ६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. त्यामुळे बुमराहच्या फिटनेसबाबत निवड समितीपुढे प्राथमिकता असेल. जर बुमराह आणि भुवीला विश्रांती दिले तर शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकटला संधी मिळू शकते.
तसेच केरळचा यॉर्कर स्पेशालिस्ट बासिल थम्पी श्रीलंके विरूद्धच्या टी-२० सीरिज दरम्यान रिझर्व्ह खेळाडू होता आणि जर भुवी किंवा बुमराह यांच्या दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही विश्रांती दिली तर थम्पीला संधी मिळू शकते.