मुंबई : टी-20 वर्ल्डकपपूर्वी विराट कोहलीने रोहित शर्मासोबत ओपनिंग करावी की नाही यावर सतत चर्चा होताना दिसतेय. विराटने नुकतंच आशिया कप स्पर्धेत आपलं 71 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. यावेळी तो सलामीला आला होता. यानंतर या चर्चेला आणखी वेग आला, मात्र भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने याला स्पष्टपणे नकार दिला आहे.
गौतम गंभीरने स्पष्टपणे सांगितलं की, विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत या फालतू गोष्टी करू नयेत, जेव्हा तुमच्याकडे केएल राहुल आणि रोहित शर्मा टीममध्ये आहेत, तेव्हा विराट कोहलीला ओपनिंग कशी करणार?
एका स्टार स्पोर्ट्स शोमध्ये गौतम गंभीर म्हणाला, "मी हे आधीही बोललो आहे की, या मुद्द्यावर वाद होऊ नये. तुम्ही 3 क्रमांकावर फ्लेक्सिबल असलं पाहिजे. जर तुमचा ओपनर 10 ओव्हर फलंदाजी करत असेल तर सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले पाहिजे जेणेकरून रन्सचा चांगला फ्लो राहील. जर विकेट लवकर पडली तर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर यायला हवं."
विराट कोहलीने आयपीएल दरम्यान सांगितलं होतं की, तो ओपनिंग करेल आणि टी-20 फॉरमॅटमध्येही टीम इंडियासाठी ओपनिंग करू इच्छितो. मात्र, विराट कोहली टीम इंडियासाठी सलग ओपनिंग करू शकला नाही, कारण केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी सध्या ही जबाबदारी सांभाळतेय.
गौतम गंभीर व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने देखील सांगितलं की, विराट कोहलीसाठी नंबर-3 सर्वोत्तम आहे, कारण तो स्ट्राइक रोटेट करू शकतो.