कटक : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली तिसरी वनडे २२ डिसेंबरला कटकमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दोन्ही टीम कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये जोरदार सराव करत आहेत. दोन्ही टीमचा सराव सुरु असतानाच भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डची बॅट हातात घेतली. कायरन पोलार्डसोबतचा बॅट घेऊन असलेला फोटो चहलने इन्स्टाग्रामवर शेयर केला. '१० किलोची बॅट आणि अडिच किलोचा हात', असं कॅप्शन चहलने या फोटोला दिलं.
युझवेंद्र चहलचा हा फोटो बघून भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर निशाणा साधला. विराटने चहलच्या या फोटोवर कमेंट केली आहे. 'अरे तुझ्या मांडीपेक्षा त्याची पोटरी मोठी आहे,' असं विराट या कमेंटमध्ये म्हणाला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजची कटकमध्ये होणारी वनडे मॅच ही निर्णयाक असणार आहे, कारण वनडे सीरिज सध्या १-१ने बरोबरीत आहे. चेन्नईच्या पहिल्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन केलं आणि विशाखापट्टणमची दुसरी वनडे जिंकली.
मागच्या २ वर्षांमध्ये चहल हा भारताचा प्रमुख बॉलरपैकी एक आहे. २०१६ साली चहलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने ५० वनडे आणि ३६ टी-२० मॅचमध्ये १३७ विकेट घेतल्या. २०१९ सालच्या वर्ल्ड कपमध्येही चहल भारतीय टीममध्ये होता. खराब फॉर्ममुळे चहलला बाहेरही बसावं लागलं होतं.