close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...आणि सेहवागने स्वत:लाच ट्रोल केलं

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या हटके ट्विटसाठी चर्चेत असतो.

Updated: Aug 12, 2019, 10:36 PM IST
...आणि सेहवागने स्वत:लाच ट्रोल केलं

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या हटके ट्विटसाठी चर्चेत असतो. ट्विटरवर सेहवाग हा अनेकजणांना ट्रोलही करतो. पण यावेळी मात्र सेहवागने स्वत:चीच फिरकी घेतली आहे. २०११ साली खेळलेल्या मॅचबद्दल लिहिताना सेहवागने महान गणितज्ञ आर्यभट यांनाही श्रद्धांजली वाहिली. 

भारताने २०११ साली इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडने भारताला ४-०ने व्हाईट वॉश केलं. या सीरिजमधल्या बर्मिंघमच्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये सेहवाग शून्यवर आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने आणि दुसऱ्या इनिंगमध्ये जेम्स अंडरसनने सेहवागला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 

या मॅचबद्दल ट्विट करताना सेहवाग म्हणाला, 'आजच्याच दिवशी ८ वर्षांपूर्वी, मी बर्मिंघममध्ये इंग्लंडविरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये शून्यवर आऊट झालो. दोन दिवसाचा प्रवास करून इंग्लंडला पोहोचल्यानंतर आणि १८८ ओव्हर फिल्डिंग केल्यानंतर हे सगळं झालं. आर्यभट यांना श्रद्धांजली. जर अयशस्वी होण्याची शून्य संधी असेल तर तुम्ही काय कराल? जर तुम्हाला कळलं असेल, तर असं करा,' असं ट्विट सेहवागने केलं. 

बर्मिंघमच्या टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये २२४ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २४४ रन रन केले. तर इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये ७ विकेट गमावून ७१० रन केले. इंग्लंडने ही मॅच इनिंग आणि २४२ रननी जिंकली. 

सेहवागने २०१५ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सेहवागने भारताकडून १०४ टेस्ट, २५१ वनडे आणि १९ टी-२० मॅच खेळल्या.