गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास...

Gautam Gambhir Salary: माजी क्रिकेटर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Cricket Team Head Coach) निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2024, 12:56 PM IST
गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास... title=

Gautam Gambhir Salary: माजी क्रिकेटर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Cricket Team Head Coach) निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी केली आहे. मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीरसमोर अनेक आव्हानं आहेत. दरम्यान सध्या त्याचं लक्ष पुढील 3 वर्षं भारतीय संघासाठी योग्य सपोर्ट स्टाफची निवड करण्यावर आहे. मात्र गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदासाठी किती पगार मिळणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पण माहितीनुसार, त्याचा पगार माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्याइतकाच असेल. 

बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "गौतमच्या बाबतीत त्याने पदभार स्विकारला हे जास्त महत्त्वाचं असून, तो कुठेही जाणार नसल्याने पगार आणि इतर गोष्टींवर नंतर चर्चा होऊ शकते. 2014 मध्ये रवी शास्त्री यांच्यासारखंच हे आहे, जेव्हा त्यांना प्रथम मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या जागी क्रिकेटचे संचालक बनवण्यात आलं होतं".

"ज्या दिवशी रवी शास्त्री आले तेव्हा त्यांच्याकडे करारही नव्हता आणि गोष्टी पूर्ण झाल्या. गौतमच्या बाबतीतही, काही बारीकसारीक तपशीलांवर काम केलं जात आहे. पगार राहुल द्रविडच्या समान श्रेणीत असेल," असं सूत्राने पुढे सांगितलं. राहुल द्रविडला 12 कोटींचं पॅकेज मिळत होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला काम करण्यासाठी स्वतःची टीम दिली जाईल, जी NCA (नॅशनल क्रिकेट अकादमी) प्रशिक्षकांशी जवळून समन्वय साधेल. जे इतर संघांचीही (भारत अ आणि अंडर-19) आणि खेळाडूंची काळजी घेतील. "मी बीसीसीआय, क्रिकेटचे प्रमुख  श्री व्हीव्हीएस लक्ष्मण, सपोर्ट स्टाफ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे, कारण आम्ही आगामी स्पर्धांमध्ये यश मिळविण्यासाठी काम करत आहोत," असं गंभीर म्हणाला होता.

लक्ष्मण सध्या टी-20 संघासह झिम्बाब्वेमध्ये आहे. परंतु तो परत आल्यावर एनसीएचे प्रमुख, नवीन मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, दोन कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्याशी आगामी वाटचालीसंबंधी चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.