नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे. या दोघांनाही त्यांच्या पदावरून डच्चू देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. तर स्टिव्ह स्मिथवर आयसीसीनंही कारवाईचा बडगा उचलला आहे. स्मिथचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
एकीकडे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर कारवाई होत असताना हे दोघं आयपीएलमध्ये खेळणार का नाही, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हे एक गंभीर प्रकरण आहे. आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घेतलेल्या निर्णयानंतर एक-दोन दिवसांमध्ये आम्ही निर्णय घेऊ, असं राजीव शुक्ला म्हणालेत. सध्या याबाबत वक्तव्य करणं योग्य नाही, असं म्हणत राजीव शुक्लांनी सावध पवित्रा घेतला.
स्मिथ हा राजस्थान रॉयल्सचा तर डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन आहे. स्टिव्ह स्मिथला राजस्थान रॉयल्सनं कर्णधारपदावरून हटवल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाला होता. पण याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या दोन्ही टीम ९ एप्रिलला एकमेकांविरुद्ध आयपीएलमधली पहिली मॅच खेळणार आहेत.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. पाचवेळच्या जगज्जेत्या संघानं कसोटी सामना जिंकण्यासाठी चेंडूशी छेडछाड करणं ही निश्चितच शर्मेंची बाब आहे. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं.
दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करताना दिसला. चेंडूला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून चेंडूला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं. बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या चेंडूशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.