या कारणांमुळे ऋषभ पंतऐवजी पुन्हा धोनीला संधी देण्याची मजबुरी

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Dec 24, 2018, 11:00 PM IST
या कारणांमुळे ऋषभ पंतऐवजी पुन्हा धोनीला संधी देण्याची मजबुरी title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या सीरिजसाठी भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर युवा विकेट कीपर ऋषभ पंतला वनडे टीममधून बाहेर काढण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे धोनीची टी-२० कारकिर्द आता संपल्याचं बोललं जात होतं. पण निवड समितीनं पुन्हा एकदा धोनीवर विश्वास टाकला आहे. याची काही कारणंही आहेत.

१ दोन महत्त्वाच्या परदेश दौऱ्यातल्या सीरिजसाठी निवड समितीनं धोनीच्या अनुभवाला महत्त्व दिलं आहे. १२ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. धोनी आधीपासूनच भारतीय वनडे टीमचा महत्त्वाचा भाग आहे.

२ वर्ल्ड कपच्या आधी आता फक्त ८ वनडे राहिल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपआधी धोनीला पूर्ण वेळ देण्यासाठी निवड समिती आग्रही असल्याचं बीसीसीआयमधल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

३ २१ वर्षांच्या ऋषभ पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजसाठी पर्याय म्हणून निवडण्यात आलं होतं. पंतनं ५ पैकी ३ मॅच विशेष बॅट्समन म्हणून खेळल्या. या ३ पैकी २ मॅचमध्ये पंतला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्यानं ४१ रन बनवले, तर त्याचा सर्वोत्तम स्कोअर २४ रन होता. या सीरिजमध्ये पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. तिसऱ्या वनडेमध्ये पंतनं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली ज्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

४ टी-२० मध्ये पंतनं चांगला खेळ दाखवला असला तरी टीमच्या गरजेनुसार तो बॅटिंग करण्यासाठी तेवढा सक्षम नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्येही पंतनं महत्त्वाच्या वेळी बेजबाबदार शॉट खेळून विकेट गमावली.

५ धोनीला बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी तो भारताचा सध्या तरी सर्वोत्कृष्ट विकेट कीपर आहे. एवढच नाही तर धोनी मैदानामध्ये कोहली आणि इतर खेळाडूंचा सल्लागार म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजवत आहे. डीआरएस घेण्याचे धोनीचे अंदाज कधीच चुकत नाहीत. एवढच नाही तर भारतीय टीममधले स्पिनरही त्यांच्या यशामागे धोनीचं योगदान असल्याचं सांगतात.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजला १२ जानेवारीपासून सिडनीतून सुरुवात होईल. यानंतर दुसरी वनडे १५ जानेवारीला ऍडलेडमध्ये आणि शेवटची आणि तिसरी वनडे १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये होईल. यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध ५ वनडे मॅचची सीरिज खेळेल. ही सीरिज २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. यानंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये ६, ८ आणि १० फेब्रुवारीला ३ टी-२० मॅचची सीरिज होईल.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद