Team India Coach Rahul Dravid : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची कायमची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासोबत भारतीय संघाला नवा मिळणारा प्रशिक्षक कोण असणार आहे याबाबतही अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बीसीसीआय (BCCI) लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल द्रविड याचे सहकारी ऋषिकेश कानिटकर (Rushikesh Kanitkar) यांची भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे राहुल द्रविड यांच्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) यांना विश्रांती देऊन हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तर सूर्यकुमारला उपकर्णधार करण्यात आले. अशा परिस्थितीत आता राहुल द्रविडला भारतीय टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदावरून मुक्त केले जाऊ शकते. भारतीय संघाने अलीकडच्या काळात मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केलेली नसल्याच्या मुख्य कारण द्रविड याच्या उचलबांगडीसाठी कारणीभूत ठरणार आहे.
क्रिकेट सल्लागार समितीकडून अंतिम निर्णय
इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने राहुल द्रविड यांना मुक्त करण्याचा प्लॅन आखला असून सततची कामगिरी पाहता त्याजागी विदेशी प्रशिक्षकांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. क्रिकेट सल्लागार समितीकडून (CAC) मंजुरी घेऊन लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. यासोबतच भारतीय संघावर स्प्लिट कोचची योजना देखील राबवली जाऊ शकते. म्हणजे एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. तर टी-20 फॉरमॅटसाठी विदेशी प्रशिक्षकांकडे संघाची जबाबदारी दिली जाईल.
विदेशी प्रशिक्षकांना संधी
महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास 7 वर्षांनी भारतीय संघाला एक विदेशी प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. 2015 वर्ल्ड कपवेळी भारतीय संघासाठी झिम्बाब्वेचे डंकन फ्लेचर हे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. आमच्या नियमांनुसार विदेशी प्रशिक्षक योग्य आढळल्यास त्याला नक्कीच संधी दिली जाईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे. तसेच "ब्रेंडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. आमच्या तत्त्वांना चपखल बसणारा परदेशी प्रशिक्षक आमच्याकडे असेल तर त्याला संधी का दिली जाणार नाही?," असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
"सध्या फक्त वर्ल्ड कप जिंकायचा आहे"
"अद्याप काहीही ठरलेलं नाही पण आम्ही अनेक पर्याय शोधत आहोत. पण सध्या आमचे संपूर्ण लक्ष घरच्या भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. आपल्याला वर्ल्ड कप जिंकायचा आहे, हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे. विविध चर्चा होत आहेत पण अंतिम निर्णयासाठी सीएसी आणि निवडकर्त्यांना अंतिम निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल," असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.