विराट कोहलीची 741 दिवसांची 'ती' प्रतिक्षा संपणार का?

विराट जवळपास महिनाभरानंतर भारताकडून सामना खेळणार आहे. 

Updated: Dec 2, 2021, 01:11 PM IST
विराट कोहलीची 741 दिवसांची 'ती' प्रतिक्षा संपणार का?

मुंबई : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना 3 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विविध कारणांमुळे दुसऱ्या टेस्ट सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. यापैकी एक कारण म्हणजे विराट कोहलीचे टीम इंडियात पुनरागमन होणार आहे. विराट जवळपास महिनाभरानंतर भारताकडून सामना खेळणार आहे. 

तर विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे. प्रथम, या सामन्यात कोहली शतक ठोकणार का? त्याचप्रमाणे कोणता फलंदाज भारतीय प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असेल? या दोन्ही गोष्टींची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारतीय कर्णधार विराट कोहलीला आधुनिक क्रिकेटचे 'रन मशीन' म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. या खेळाडूने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 70 शतकं झळकावली आहेत. पण नाण्याची दुसरी बाजू म्हणजे कोहलीला दोन वर्षांहून अधिक काळ शतक झळकावता आलेलं नाही. 

त्याचं शेवटचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध झालं होतं. तेव्हापासून जणू त्याच्या शतकांच्या खेळीला ब्रेक लागला आहे. तो आऊट ऑफ फॉर्म आहे असं म्हणता येणार नाही. विराटने शेवटचं शतक झळकावल्यानंतर अनेक अर्धशतकं झळकावली आहेत. पण त्याचं शतकात रूपांतर त्याला करता आलेलं नाही.

मुंबईत विराटचं नशीब बदलणार का?

विराट कोहलीने शेवटचं शतक झळकावून 741 दिवस झाले आहेत. त्याची ही प्रतिक्षा भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटीत संपू शकते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. विराटने या मैदानावर 4 कसोटी सामने खेळले असून 72.17 च्या सरासरीने 433 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग 71 शतकांसह आहे. विराट कोहलीने 70 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत. म्हणजेच रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून तो केवळ एक शतक दूर आहे.