मुंबई : आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने तिसरा विजय नोंदवला आहे. पाकिस्तान, वेस्ट इंडिजनंतर आता टीम इंडियाच्या बांगलादेशच्या महिलांना धूळ चारली आहे. भारतीय महिलांनी बांग्लादेशचा 110 रन्सने पराभव केला आहे. सलग दोन पराभवांनंतर टीम इंडियाने हा विजय नोंदवला आहे.
मिताली राजने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी टीम इंडियाने बांग्लादेशला 230 रन्सचं आव्हान दिलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना बांग्लादेशची संपूर्ण टीम केवळ 119 रन्समध्ये माघारी परतली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभव स्विकारल्यानंतर टीम इंडियावर टीका करण्यात येत होती.
टीम इंडियाच्या महिलांनी ओपनिंग करत चांगली भागिदारी केली होती. भारताने 74 रन्सवर पहिली विकेट गमावली होती. भारताकडून यास्तिका भाटियाने 50 रन्सची उत्तम खेळी केली. तर शेफाली वर्मानेही 42 रन्सची मोलाची खेळी केली.
230 धावांचं लक्ष पार करण्यासाठी बांग्लादेश टीम मैदानावर उतरली. मात्र विरूद्ध टीमची सुरुवात काही खास झाली नाही. अवघ्या 119 रन्सवर टीम इंडियाने त्यांना ऑल आऊट केलं. यावेळी भारताकडून स्नेह राणाने 4 विकेट्स घेतल्या. तर झुलन गोस्वामी आणि पूजाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत.