मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपवर नाव कोरण्याचा इतिहास १९७५ साली वेस्ट इंडिजने घडवला होता. यानंतर पुन्हा १९७९ साली वेस्ट इंडिजने लागोपाठ दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. पण तिसऱ्या वर्ल्ड कपपासून वेस्ट इंडिजच्या सुवर्णकाळाला जी उतरती कळा लागली ती आजपर्यंत कायम आहे.
१९८३ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताकडून विंडिजचा पराभव झाला आणि त्यानंतर विंडिजचा संघ कधीही विजेतपद पटकावू शकला नाही. किंबहूना अंतिम फेरीतही दाखल होऊ शकला नाही.
क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्त्वाखाली विंडीज संघानं सुवर्णकाळ अनुभवला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली विंडिजनं १९७५ आणि १९७९मध्ये विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली. तर १९८३मध्ये विंडिजला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
१९८३ नंतरच्या वर्ल्ड कपमध्ये कधी उपांत्य फेरी, कधी उपांत्यपूर्व फेरी तर कधी साखळी फेरीतच विंडिजचं आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर विंडिज संघाला एकप्रकारे घरघर लागली. विंडीज संघाकडे विजयाचे दावेदार म्हणून आता पाहिलं जात नाही.
विंडिज क्रिकेट संघटना आणि क्रिकेटमधील वाद एवढे विकोपाला गेले की त्याचा परिणाम त्यांच्या दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीवर झाला. काही महत्त्वाचे खेळाडू संघापासूनच दूर झाले तर काही खेळाडू अगदी निवृत्तीचा विचार करु लागले. नाही म्हणायला त्यांनी २०१२ आणि २०१६ टी-२० वर्ल्ड कप जिंकला. कारण त्यांच्या संघात एकप्रकारे आक्रमकपणा ठासून भरला गेला आणि तेवढात बिनधास्तपणाही. त्यामुळेच ५० षटकांपर्यंत खेळपट्टीवर उभं राहून सामना जिंकून देण्याची सहनशीलता किंवा मानसिकता विंडिज खेळाडूंनी गमावलीय असं म्हणावं लागेल.
प्रत्येक सामन्यात एखाद-दुसऱ्या खेळाडूच्या कामगिरीच्या जोरावरच या संघाने सामने जिंकले आहेत. या संघाचं भवितव्य प्रामुख्यानं अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्याने विंडिजची बॅटिंग ही अगदी नवव्या स्थानापर्यंत आहे.
ख्रिस गेल, ईविन लेविस, शिम्रॉन हेटमायर, शाई होप, डॅरेन ब्राव्हो, आंद्रे रसेल यांच्यावर प्रामख्याने विंडीजच्या बॅटिंगची भिस्त असेल. तर जेसन होल्डर, अॅश्ले नर्स आणि कार्लेस ब्रेथवेट हे बॅटिंगबरोबरच बॉलिंगमध्येही योगदान देऊ शकतात. शॅनन ग्रॅबियल, केमार रोच, ब्रेथवेट आणि शेल्डन कॉटरेल हे इंग्लिश वातावरणात धोकादायक बॉलिंग करु शकतात. आता विंडिजचा संघ आक्रमक पण तेवढीच संयामानं आणि जबाबदारीनं खेळी करतो का यावर त्याचं विश्वचषकातील भवितव्य अवलंबून असेल.