वर्ल्डकपमध्ये इंग्लंड संघ अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. गतवर्षीचा चॅम्पियन असणारा इंग्लंड संघ या वर्ल्डकपमध्ये मात्र सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात इंग्लंड संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यातच आज इंग्लंड संघ श्रीलंकेशी भिडणार असून, या सामन्यात विजय मिळवत पुनरागमन करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात हा सामना खेळला जात आहे.
श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स मैदानात घाम गाळताना दिसत होता. पण 2019 वर्ल्डकप जिंकण्यात मोलाचा वाटा उचलणारा बेन स्टोक्स यावेळी इनहेलरचा वापर करत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. बेन स्टोक्स वारंवार इनहेलरचा वापर करत असल्याने त्याला अस्थमाचा त्रास आहे का? अशी शंका क्रिकेटचाहते उपस्थित करत आहेत.
पण बेन स्टोक्स, इंग्लंड किंवा वेल्स क्रिकेट बोर्डाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. महत्त्वाचं म्हणजे, इनहेलर फक्त अस्थमाग्रस्त व्यक्तीच वापरते असं काही नाही. डॉक्टर विविध कारणांसाठी इनहेलरचा वापर करण्याचं सुचवतात. काही खेळाडूंना व्यायाम करताना किंवा व्यायाम केल्यानंतर फार थकवा जाणवत श्वास घेताना त्रास होतो. त्यामुळेही डॉक्टर इनहेलर वापरण्यास सांगतात.
Ben Stokes was using an inhaler during England's practice session at the Chinnaswamy Stadium. pic.twitter.com/iqR7OfPxRR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2023
तसंच, स्टोक्स गुडघा आणि इतक दुखापतींनी त्रस्त असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही गैर-कार्यक्षमता वाढवणारे स्टिरीओड्स घेण्याकरिता देखील त्याचा वापर करत असावा अशी शंका आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरुत बेन स्टोक्सने फार सराव केला. त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या सरावात भाग घेतला. पहिल्या तीन सामन्यांना मुकल्यानंतर बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात संघात पुनरागमन केलं होतं. पण तो फक्त 5 धावाच करु शकला.
32 वर्षीय बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली होती. पण इंग्लंडला वर्ल्डकप स्पर्धेत मदत करण्याच्या हेतूने निवृत्ती मागे घेत तो संघात सहभागी झाला आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरोधातील सामन्यात तो आपली छाप सोडू शकला नाही. दरम्यान, पुढील स्पर्धेत तो फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.