'इतकी हाव...', WC फायनलआधी इंग्लंडचा खेळाडू संतापला, म्हणाला 'हे अजिबात योग्य नाही'

वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडल्यानंतर 4 दिवसातच ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात टी-20 मालिका पार पडणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 17, 2023, 03:02 PM IST
'इतकी हाव...', WC फायनलआधी इंग्लंडचा खेळाडू संतापला, म्हणाला 'हे अजिबात योग्य नाही' title=

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार हे आता निश्चित झालं आहे. भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. रविवारी 19 नोव्हेंबरला दोन्ही संघ भिडणार आहेत. संपूर्ण क्रीडावश्वाचं या सामन्याकडे लक्ष आहे. दरम्यान फायनलमध्ये भिडल्यानंतर चारच दिवसात ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान यावरुन इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनने नाराजी जाहीर केली आहे. 

मायकल वॉनने एक्सवर पोस्ट शेअर करत या मालिकेवर नाराजी जाहीर केली आहे. फायनल खेळणारे दोन्ही संघ फक्त 4 दिवसात एकमेकांविरोधात टी-20 मालिका खेळणं आपल्याला योग्य वाटत नसल्याचं मायकल वॉनने म्हटलं आहे. कोणताही संघ वर्ल्डकप जिंकला तरी त्यांना योग्य पद्धतीने आनंद साजरा करण्यासाठी संधी दिली पाहिजे असं मायकल वॉन म्हणाला आहे. हा फारच लोभ असल्याची टीका त्याने केली आहे. 

मायकल वॉनने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, "दोन्ही फायनलिस्ट संघ फक्त 4 दिवसात एकमेकांविरोधात टी-20 मालिका खेळणं मला योग्य वाटत नाही. वर्ल्डकपनंतर त्यांना आराम करण्याची संधी आपण का देत नाही आहोत. किंवा जो संघ जिंकेल त्याला किमान काही आठवडे तरी विजय साजरा करण्याची संधी दिली पाहिजे. हे फारच लोभ आणि जीवघेणं आहे".

टी-20 चं वेळापत्रक जाहीर

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण 5 टी-20 सामने खेळले जाणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आतापर्यंत 26 वेळा आमने-सामने आले असून भारताचं पारडं जड आहे. भारत 15 तर ऑस्ट्रेलिया 10 वेळा जिंकला आहे. 

ऑस्ट्रेलियाने या वर्षाच्या सुरुवातीला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, एकदिवसीय मालिकेसह विविध स्पर्धांसाठी भारताचा दौरा केला होता. यामधून टी-20 वगळण्यात आलं होतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटची टी-20 मालिका 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी झाली होती. यामध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान पाचवा सामना हैदराबादला होणार होता, पण त्याचं ठिकाण बंगळुरूला हलवण्यात आलं आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. हार्दिक पांड्या अद्यापही दुखापतीमधून सावरत आहे. 

T20 मालिकेचं वेळापत्रक, सामन्याच्या वेळा

पहिला सामना - 23 नोव्हेंबर, 7 वाजता, विशाखापट्टणम
दुसरा सामना - 26 नोव्हेंबर, 7 वाजता, तिरुअनंतपुरम
तिसरा सामना - 28 नोव्हेंबर, 7 वाजता, गुवाहाटी
चौथा सामना - 1 डिसेंबर, 7 वाजता, नागपूर
पाचवा सामना - 3 डिसेंबर, 7 वाजता, बंगळुरु