भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठा कट उधळला; झेरॉक्सच्या दुकानातून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये...; क्राइम ब्रांचही चक्रावली

आरोपी एका फोटोकॉपीच्या दुकानातून काम करत होते. आरोपींनी 14 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्याची जवळपास 40 खोटी तिकीटं विकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 11, 2023, 04:51 PM IST
भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठा कट उधळला; झेरॉक्सच्या दुकानातून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये...; क्राइम ब्रांचही चक्रावली title=

भारत-पाकिस्तान सामन्याआधी अहमदाबाद क्राइम ब्रांचने मोठा कट उधळला आहे. क्राइम ब्रांचने बोडकदेव परिसरातून चार तरुणांना अटक केली आहे. या तरुणांकडे पोलिसांना भारत-पाकिस्तानच्या वर्ल्डकप सामन्याची 150 बनावट तिकीटं सापडली आहेत. पोलिसांना यावेळी आरोपी तिकीटांची छपाई करण्यासाठी वापरत असलेल्या इतर मशिन्सही सापडल्या आहेत. 

अटक केलेल्या चौघांची ओळख पटली आहे. मेमनगर येथील कुश मीना (21), गांधीनगरच्या झुंडाल येथील राजवीर ठाकोर (18), घाटलोडिया येथील ध्रुमिल ठाकोर (18) आणि साबरमती येथील 18 वर्षीय जयमीन प्रजापती अशी त्यांची नावं आहेत. गुन्हेगारी कट रचणे, विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग, फसवणूक यासारखे गुन्हे या आरोपींविरोधात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांचा यापूर्वीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. आपल्या चैनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे कृत्य ते करत होते.

क्राइन ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार असून, हा सामना पाहण्यासाठी प्रचंड उत्साह आहे. हा उत्साह लक्षात घेत, अहमदाबाद पोलीस आयुक्तांनी बनावट तिकीटांची छपाई आणि काळाबाजार संबंधीच्या हालचाली रोखण्याच्या आणि त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पोलिसांना चार तरुण बनावट तिकीटांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी कृष्णा झेरॉक्स दुकानावर छापा टाकला. यावेळी 150 बनावट तिकीटांसह, कलर प्रिंटर, कॉम्प्यूटर मॉनिटर, सीपीयू, पेन ड्राइव्ह, पेपर कटर आणि 1.98 लाख किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी यावेळी आरोपींनी विकलेली 40 बनावट तिकीटं पुन्हा मिळवण्यात यशही मिळवलं आहे. 

कुश याचं झेरॉक्सचं दुकान आहे. राजवीर, ध्रुमील आणि जयमीन यांनी त्याला बनावट तिकीटं तयार करण्यासाठी संपर्क साधला होता. कुश याने बनावट तिकीट तयार करण्यासाठी एक खरं तिकीट आणण्यास सांगितलं होतं. ध्रुमील याने आपल्या ओळखीतून एक खरं तिकीट मिळवलं. यानंतर त्यांनी बनावट तिकीटं छापण्यास सुरुवात केली. आरोपींनी यासाठी एक कलर प्रिंटरही विकत आणला होता. 

त्यानंतर कुशने फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरून बनावट तिकिटं बनवली. त्यानंतर जेमिन आणि राजवीर यांनी त्यांच्या मित्रांमार्फत सुमारे 40 बनावट तिकिटं विकली. तिकीटाची मागणी वाढल्याने चौघांनी आणखी बनावट तिकिटे बनवण्यास सुरुवात केली. आरोपी तिकीट खरेदी करणाऱ्यांच्या क्षमतेनुसार 2000 रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यत तिकीट विकत होते. 

"चौघांनी आणखी बनावट तिकिटं विकली असण्याची शक्यता आहे. काही असामाजिक घटक आणि काळाबाजार करणार्‍यांनी विकत घेतल्याची शक्यता असल्याने, पुढील तपास सुरू आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.