एकदिवसीय वर्ल्डकपमधील सामन्यात भारताविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. सामन्यानतंर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात भारताने 7 गडी राखून पाकिस्तानचा मोठा पराभव केला. या पराभानंतर मिकी आर्थर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले असता, भारत-पाकिस्तानमधील हा सामना आयसीसीने आयोजित केल्यासारखं वाटलं नाही असं म्हटलं. मैदानातील प्रेक्षकांची गर्दी, डीजे आणि वातावरण हे तटस्थ नव्हतं. पण मी हे कारण म्हणून वापरणार नाही असं ते म्हणाले.
"हे पाहा, खरं सांगायचं तर आजचा सामना हा अजिबात आयसीसीने आयोजित केलेला वाटला नाही. मी खोटं सांगणार नाही. ही द्विपक्षीय मालिका वाटत होती. बीसीसीआयने याचं आयोजन केल्यासारखं वाटत होतं. मला मायक्रोफोनवरुन एकदाही 'दिल दिल पाकिस्तान' ऐकायला मिळालं नाही," असं मिकी आर्थर म्हणाले.
"या गोष्टी नक्कीच फरक पाडतात. पण मी हे पराभवाचं कारण म्हणून वापरणार नाही. हा प्रश्न तो क्षण जगण्याचा, पुढील चेंडूचा आणि तुम्ही भारतीय संघ, भारतीय खेळाडूंना कसे सामोरे जाता याचा होता," असं मिकी आर्थर यांनी सांगितलं.
मिकी आर्थर यांच्या विधानावरुन वाद पेटला असून पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गद खेळाडू वसीम अक्रम यानेही यावरुन नाराजी जाहीर केली आहे. पाकिस्तानमधील एका स्पोर्ट्स चॅनेलवर चर्चा करताना त्याने मिकी आर्थर यांना खडे बोल सुनावले. "या वक्तव्याचं नेमकं काय करायचं हे मला समजत नाही आहे. तुमच्याकडे कुलदीप यादवविरोधात काय योजना आहे ते आम्हाला सांगा, आम्हाला ते ऐकायचं आहे. इतर चर्चांमध्ये आम्हाला रस नाही. अशी विधानं करुन तुम्ही हे टाळू शकता असं तुम्हाला वाटत आहे का? दुर्दैवाने ते शक्य नाही," अशी टीका वसीम अक्रमने संतापून केली.
मोईन खानही या चर्चेत सहभागी होता. वसीम अक्रमच्या विधानावर सहमती दर्शवत त्याने म्हटलं की, कोच प्रेक्षकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापेक्षा त्यांनी आपल्या कामावर लक्ष द्यावं.
"ते विषय भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते भावनिक मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी इतर गोष्टींपेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावं. त्यांनी मांडलेला मुद्दा योग्य आहे पण कोच असताना तुम्ही अशा गोष्टी बोलू शकत नाही," असं मोईन खान म्हणाला. "जिंकणं आणि हारणं हा खेळाचा भाग आहे. पण आपण का हारलो आणि काय चूक झाली हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे," असं त्याने सांगितलं.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना पूर्ण 50 ओव्हरही खेळू शकला नाही. 155 धावांवर 2 बाद नंतर पाकिस्तान संघ 191 धावांवर गारद झाला. भारताने अत्यंत सहजपणे या लक्ष्याचा पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची जबरदस्त खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. भारताने 7 गडी राखून हा सामना जिंकला.