'उगाच आपलं व्हेरिएशनच्या नावाखाली....', भारताच्या World Cup टीमवर मुरलीधरनची बोथट टीका

श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने भारताच्या एकदिवसीय वर्ल्ड कप संघावर बोथट टीका केली आहे. यावेळी त्याने कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा ही भारतीय संघासाठी अत्यंत योग्य जोडी असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 7, 2023, 01:12 PM IST
'उगाच आपलं व्हेरिएशनच्या नावाखाली....', भारताच्या World Cup टीमवर मुरलीधरनची बोथट टीका title=

भारताने एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली असून, यानंतर त्याबाबत वेगवेगळी मतं मांडली जात आहे. त्यातच आता श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्यावर भाष्य केलं आहे. भारताच्या वर्ल्डकप संघात दोन फिरकी गोलंदाज पुरेसे आहेत असं मुरलीधरनचं म्हणणं आहे. फक्त इच्छेखातर संघात तिसरा विशेष धीम्या गतीचा गोलंदाज घेण्याची गरज नाही असं स्पष्टपणे त्याने म्हटलं आहे. 

भारताने 15 सदस्यांचा संघ जाहीर करताना रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान दिलं आहे. यावर मुरलीधरनने म्हटलं आहे की "फक्त विविधता असावी म्हणून तुम्ही संघात तीन फिरकी गोलंदाज घेऊ शकत नाही. फक्त दोन फिरकी गोलंदाज पुरेसे आहेत. जाडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत असून, आणखी एक गोलंदाज पुरेसा आहे," असं मुरलीधरनने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित '800' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने त्याने ही मुलाखत दिली. 

800 विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मुथय्या मुरलीधरनने कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा ही योग्य जोडी असल्याचा दाखला दिला आहे. "तुम्हाला योग्य जोडी कोणती आहे ते पाहावं लागणार आहे. जर त्यांनी जाडेजा आणि कुलदीप यादव यांना खेळवलं तर चांगलं आहे. कारण यामुळे एक ऑफ स्पिनर आणि रिस्ट स्पिनर असे दोन पर्याय मिळतील," असं मुरलीधरनने म्हटलं आहे.

युजवेंद्र चहलला संघात स्थान न देण्यावरुन बरीच चर्चा सुरु आहे. त्यावर मुरलीधरनने कुलदीप आणि राखीव फिरकीपटू अक्षर पटेल हे दोघेही चांगल्या लयीत असल्याने हा योग्य निर्णय असल्याचं सांगितलं आहे. "मला आर अश्विन आणि चहल यांच्या सध्याच्या फॉर्मबद्दल काही माहिती नाही. टी-20 च्या आधारे तुम्ही खेळाडूंची निवड करु शकत नाही. एकदिवसीय क्रिकेट वेगळं आहे," असं मुरलीधरनने सांगितलं. "कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी चहलच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे," असंही त्याने सांगितलं.

"चहल घरगुती क्रिकेट खेळत आहे का? जर नाही, तर मग त्याची निवड कशी करणार? तो बाहेर आहे. जर तो घरगुती क्रिकेट खेळत नसेल तर मग तुम्ही त्याची निवड कशी करु शकता?," अशी विचारणा मुरलीधरनने केली आहे.

चहलने यावर्षी जानेवारीमध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. मुरलीधरनने सांगितले की निवडकर्त्यांनी निवड केल्यास तो कामगिरी करण्यात अपयशी ठरला असता. "चहलच्या बाबतीत, जर त्याने घरगुती आणि एकदिवसीय क्रिकेट खेळले नसेल, तर तुम्ही त्याला निवडू शकत नाही. जर त्याने चांगली कामगिरी केली नाही तर काय होईल? प्रत्येकजण निवडकर्त्यांना विचारेल की तुम्ही अशा व्यक्तीला का निवडले आहे जो गेल्या 6 महिन्यात खेळला नाही," असं मुरलीधरनने सांगितलं.

"रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे सर्वोत्तम खेळाडू असून, अजून बराच खेळ बाकी आहे. असं असताना तुम्ही हा त्यांचा शेवटचा वर्ल्डकप असेल असं का विचारत आहात?," असा प्रतिप्रश्न मुरलीधरनने केला. पुढे त्याने म्हटलं की "विराट आता फक्त 34 वर्षांचा आहे. तो अजून पुढील 5 वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. रोहित 36 वर्षांचा आहे. क्रिकेट खेळणं कधी बंद करायचं हा त्यांचा निर्णय आहे".