'विराट कोहली कुठे...'; नसीर हुसैनने इंग्लंडच्या संघाला 'फालतू कारण' देण्यावरुन सुनावलं

World Cup 2023 Nasser Hussain Slams England Players: इंग्लंडच्या संघाचा त्यांच्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव झाला असून यासाठी देण्यात आलेलं कारण ऐकून नासीर हुसैनने संघाची कानउघडाणी केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 27, 2023, 02:00 PM IST
'विराट कोहली कुठे...'; नसीर हुसैनने इंग्लंडच्या संघाला 'फालतू कारण' देण्यावरुन सुनावलं title=
इंग्लंडने पाच पैकी 4 सामने गमावले

World Cup 2023 Nasser Hussain Slams England Players: इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैनने इंग्लंडच्या संघावर सडकून टीका केली आहे. इंग्लंडचा संघ वर्ल्ड कप 2023 मधील स्पर्धेत चौथा सामना पराभूत झाल्यानंतर हुसैन यांनी आपल्या संघावर आगपाखड केली. 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलेल्या संघाबद्दल बोलताना हुसैनने तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचाही उल्लेख केला.

कठोर शब्दांमध्ये टीका

26 तारखेला बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडला श्रीलंकेच्या संघाने 8 विकेट्स राखून पराभूत केलं. माजी विश्वविजेत्या संघाच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता जवळपास पूर्णपणे मावळली आहे. या परभावानंतर हुसैनने आपल्या संघाने पराभवाचं कारण देताना केलेल्या दाव्यांची अगदी चिरफाड केली आहे. इंग्लंडचा संघ फारच फालतू कारणं देत आहे असा दावा हुसैनने केला आहे. इंग्लंडमधील क्रिकेटच्या रचनेला सध्याच्या वर्ल्ड कपमधील सुमार कामगिरीसाठी दोषी ठरवलं जात असल्याच्या मुद्द्यावरुन हुसैनने कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंच्या सुमार कामगिरीवर पांघरुण घालण्यासाठी हे कारण दिलं जात आहे. हे कारण हुसैनला पटलेलं नाही.

दोष खेळाडूंचाच

इंग्लंडचा संघ घरगुती स्तरावरील 50 ओव्हरचं क्रिकेट फारसं खेळत नाही, असं म्हणत संघाच्या सुमार कामगिरीचा बचाव केला जात असल्याने हुसैन यांनी विराट कोहली आणि हेनरीक कार्ल्सनचा उल्लेख करत सातत्याने इंग्लंडचा होत असलेला पराभव हा खेळाडूंचाच दोष असल्याचं, म्हटलं आहे.

खेळाडूंना पाठीशी घालणं आवडत नाही

"खेळाडूंना पाठीशी घालणं मला अजिबात आवडलेलं नाही. आपण इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये हे अनेकदा करतो. जेव्हा ते 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकले आणि 20 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकले तेव्हा संघ उत्तम नव्हता का? ते फार उत्तम होते. आता गाडी रुळावरुन घसरली तर क्रिकेटच्या रचनेला दोष द्यायचं. इंग्लिश क्रिकेटची रचना सुरुवातीपासूनच आहे आणि सध्याची आपली कामगिरी लज्जस्पद आहे हे मान्य करायला हवं," असं हुसैन म्हणाला.

थेट विराटचाही केला उल्लेख

"आपण 20 ओव्हरचं क्रिकेट खेळतो, आपण 100 चेंडूंचं क्रिकेट खेळतो आणि आपण 50 ओव्हरचं क्रिकेट पुरेश्या प्रमाणात खेळत नाही. विराट कोहली कुठे घरगुती क्रिकेट खेळतो? हेनरीक कार्ल्सन किंवा इतर कोणते खेळाडू 50 ओव्हरचं स्थानिक स्तरावरील क्रिकेट खेळतात का? ते स्थानिक स्तरावरील क्रिकेट खेळतच नाहीत. ते टी-20 फ्रेंचायजी क्रिकेटमधून शिकले आहेत," असं हुसैनने 'स्काय स्पोर्ट्स'शी बोलताना म्हटलं आहे.

6 वर्षांपासून सर्वोत्तम संघ

"यामुळेच हा संघ 6 वर्षांपासून सर्वोत्तम कामगिरी करत आहे. जगभरामध्ये हा संघ क्रिकेट खेळून सर्वोत्तम झाला आहे. त्यामुळे आता दिलं जाणारं कारण हे फारच फालतू आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेटच्या रचनेला दोष देता तेव्हा खेळाडूंना पाठीशा घालता. या रचनेमुळेच हा संघ विश्वविजेता झाला आहे. तीच रचना आजही आहे. या स्पर्धेतील सामन्यांआधी तुम्हीच बॉलवरुन नजर हटवली असेल किंवा पुरेसा सराव केला नसेल. मात्र तुम्ही या रचनेमधूनच घडला आहात हे लक्षात ठेवा," असं हुसैन म्हणाला.

ते गोंधळ घालतात तेव्हा...

"ते गोंधळ घालतात तेव्हा घालतात हे मान्य करायला हवं. त्यासाठी रचनेला दोष का द्यावा. स्थानिक क्रिकेटमुळे इंग्लंडमध्ये क्रिकेटपटू घडतात. मग ते 100 चेंडूंचं क्रिकेट खेळणारे असो, 50 ओव्हरचं क्रिकेट खेळणारे असो किंवा इतर कोणतेही. त्यामुळेच जेव्हा तुम्ही अपयशी ठरता तेव्हा दोष स्वीकारला पाहिजे असं माझं मत आहे," असं हुसैन म्हणाला.