'मी त्याला स्वत: फोन करुन...', वसीम अक्रमने 'टीव्हीवर टीका करणारे' म्हटल्यानंतर स्टार खेळाडूचा खुलासा

पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने काहीजण फक्त टीव्हीवर बसून टीका करत आहेत असं विधान केल्याने माजी खेळाडू संतापले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Nov 13, 2023, 11:21 AM IST
'मी त्याला स्वत: फोन करुन...', वसीम अक्रमने 'टीव्हीवर टीका करणारे' म्हटल्यानंतर स्टार खेळाडूचा खुलासा title=

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने टीव्हीवर बसून क्रिकेटर्सना ज्ञान देणाऱ्यांवर टीका केली आहे. वसीम अक्रमने अप्रत्यक्षपणे अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम आणि मोहम्मद आमीर यांच्यावर निशाणा साधला. इमादने 2020 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तर मोहम्मद आमीरही त्याचवर्षी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. व्यवस्थापनाकडून योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप करत मोहम्मद आमीरने निवृत्ती घेतली होती. वसीम अक्रमने अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका करताना काही खेळाडूंनी टीव्ही शोमध्ये बसण्यापेक्षा स्थानिक क्रिकेटवर लक्ष दिलं पाहिजे असा टोला लगावला. 

"जे खेळाडू पाकिस्तान संघासह व्यग्र आहेत त्यांच्याबद्दल समजू शकतो, पण इतरांचं काय? यामधील काहीजण टीव्हीमधील चर्चांमध्ये जाऊन बसले आहेत आणि त्यांना पाकिस्तान संघासाठी खेळायची इच्छा आहे? ते कसं काय शक्य आहे?," असं वसीम अक्रमने A-Sports शी संवाद साधताना म्हटलं. वसीम अक्रमच्या टीकेला इमादने उत्तर दिलं आहे. 

GEO News वरील 'हसना मना है ' कार्यक्रमात बोलताना इमादने वसीम अक्रमला उत्तर देताना काही वर्षांपूर्वी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली असतानाही मला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं असा खुलासा केला. 

"मी पाकिस्तान संघासाठी खेळत असताना अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जगात दुसऱ्या क्रमांकावर होतो. पण कोणतंही कारण नसताना मला संघातून वगळण्यात आलं. मी जर स्थानिक क्रिकेट खेळल्यास राष्ट्रीय संघासाठी माझा विचार केला जाईल याची काय खात्री आहे? तसंच ज्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं आहे, त्यांच्या सल्ल्याची गरज असेल तर मी स्वत: फोन करेन," असं इमादने सांगितलं.

इमादने यावेळी निवड समितीवरही टीका केली. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणं तुम्हाला राष्ट्रीय संघात स्थान देण्याची खात्री देत नाही असं त्याने सांगितलं. "दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला स्थानिक क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आलं तेव्हाची माझी कामगिरी पाहू शकता. पण त्यानंतरही माझा विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे याची काहीच खात्री नाही," असं इमाद म्हणाला आहे.