'काही घाबरलेले फलंदाज 110 चेंडूत फक्त 60 धावा करतात,' पत्रकाराचा प्रश्न ऐकताच द्रविड म्हणाला, 'आम्ही भीतीपोटी...'

भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.   

शिवराज यादव | Updated: Nov 21, 2023, 11:58 AM IST
'काही घाबरलेले फलंदाज 110 चेंडूत फक्त 60 धावा करतात,' पत्रकाराचा प्रश्न ऐकताच द्रविड म्हणाला, 'आम्ही भीतीपोटी...' title=

संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या फलंदाजीने दबदबा तयार केलेला भारतीय संघ नेमक्या फायनलध्ये ढेपाळला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय संघ कामगिरीचं सातत्य राखू शकला नाही आणि तोंडचा घास ऑस्ट्रेलिया संघाने हिरावून घेतला. पण भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्या फलंदाजांची पाठराखण केली आहे. आपले फलंदाज सुरक्षितरित्या खेळत नव्हते आणि परिस्थितीप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली असं राहुल द्रविड म्हणाला आहे. भारताने फायनलमध्ये फक्त 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 43 ओव्हर्समध्येच हे टार्गेट पूर्ण केलं आणि सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा रेकॉर्ड केला. 

81 धावांवर 3 विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली आणि के एल राहुलने धीम्या गतीने फलंदाजी केली. विराटने 63 चेंडूत 54 आणि के एल राहलुने 107 चेंडूत 66 धावा केल्या. दोघांनी आपल्या भागीदारीदरम्यान फक्त 2 चौकार लगावले. 

अंतिम सामन्यात भारतीय संघ फार घाबरुन खेळतो का? यासंबंधी प्रशिक्षक राहुल द्रविडला प्रश्न विचारण्यात आला.  "गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात आपण 20 षटकांत 170 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने त्याचा सहज पाठलाग केला होता. आज आपण 240 धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. रोहित या विकेटवर येतो आणि 30 चेंडूत 45-47 धावा करतो. पण दुसरीकडे असे काही फलंदाज आहेत जे 110 चेंडूंवर 60-65 धावा करू शकतात आणि स्ट्राइक रेट खूप कमी आहे. मोठ्या सामन्यांमध्ये आपण थोडे घाबरून खेळतो. हा दृष्टिकोन योग्य नाही असं तुम्हाला वाटतं का? गेल्या 3-4 विश्वचषक, आशिया चषकापासून हे दिसून येत आहे", असा प्रश्न राहुल द्रविडला विचारण्यात आला. 

त्यावर उत्तर देताना राहुल द्रविड म्हणाला की, "आम्ही या स्पर्धेत घाबरून खेळलो यावर माझा विश्वास नाही. अंतिम सामन्यात आम्ही 10 षटकात 80 धावा केल्या होत्या. आम्ही विकेट गमावत होतो. जेव्हा तुम्ही विकेट गमावता तेव्हा तुम्हाला तुमची रणनीती आणि डावपेच बदलावे लागतात. आम्ही या स्पर्धेत हे दाखवून दिलं आहे. जेव्हा आम्ही इंग्लंडविरुद्ध हरत होतो तेव्हा वेगळ्या पद्धतीने खेळलो. तुम्हाला खेळावं लागतं. तुम्ही फ्रंटफूट क्रिकेटने सुरुवात करता. या सामन्यात, फायनलमध्ये, आम्ही घाबरुन खेळलो नाही. त्यांनी मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली".

"आम्ही तीन विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे, आम्हाला सुरळीत होण्यासाठी कालावधी हवा होता. पण जेव्हा जेव्हा आम्हाला वाटले की आम्ही आक्रमण किंवा सकारात्मक खेळ करू आणि पुढे जाऊन फटकेबाजी करू, तेव्हा आम्ही विकेट गमावल्या. त्यामुळे, तुम्हाला पुन्हा खेळी उभी करावी लागते. जेव्हा तुमच्याकडे भागीदारी असते तेव्हा ती उभी करावी लागते. तुम्ही संघाची फलंदाजी पाहिली. एक काळ असा होता की मार्नस आणि हेड खेळत होते. त्यांनी ते स्थापित केले. पण ते आऊट झाले नाहीत, म्हणून ते खेळत राहिले. जर तुम्ही मधेच विकेट गमावत राहिलात तर , मग तुम्हाला पुन्हा उभं राहावं लागतं. पण आम्ही बचावात्मक खेळलो नाही," असं राहुल द्रविडने सांगितलं.

भारतीय संघ 2013 मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा दुष्काळ संपवेल अशी आशा होती. पण वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव झाल्याने या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. 

वर्ल्डकप स्पर्धेसह राहुल द्रविडचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळही संपला आहे. दरम्यान पुढे आपल्याकडे कोणती जबाबदारी असेल याबाबत माहिती नसल्याचं द्रविडने म्हटलं आहे. "मी पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपबद्दल काही विचार केलेला नाही. भविष्यात काय असेल याची कल्पना नाही," असं त्याने सांगितलं.

राहुल द्रविडने यावेळी कर्णधार रोहित शर्माचं तोंडभरुन कौतुक केलं. "रोहित हा एक अपवादात्मक नेतृत्व आहे. तो नेहमीच नियोजन  करण्यासाठी कटिबद्ध होता. या मोहिमेसाठी त्याने आपला वैयक्तिक वेळ आणि ऊर्जा दिली. साहजिकच निराशा झाली आहे. परंतु या संघाने गेल्या काही महिन्यांत खूप आनंद दिला आहे. अर्थातच, रोहित आणि टीम निराश आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांना भावूक पाहणं कठीण आहे. पण उद्या सूर्य उगवेल आणि खेळाडू म्हणून आम्ही पुढे जाऊ," असा विश्वास राहुल द्रविडने व्यक्त केला आहे.