सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

World Cup 2023 : कोणते खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार? रोहित शर्मानं केलंय तोंड भरून कौतुक. संघाच्या कर्णधारपदी असणारा रोहित काय म्हणाला पाहा... 

सायली पाटील | Updated: Nov 3, 2023, 07:50 AM IST
सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय title=
World Cup 2023 team india captain Rohit Sharma lauds batsman and bowlers for the win against sri lanka

World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघानं (Team India) मुंबईत खेळवल्या गेलेल्या यंदाच्या वर्ल्ड कपच्या 33 व्या सामन्यात विजय मिळवला. श्रीलंकेच्या (Sri Lanka) क्रिकेट संघावर मात करत टीम इंडियानं या सामन्यात सलग सातवा विजय मिळवला आणि त्यातही मोठ्या फरकानं हा सामना खिशात टाकल्यामुळं संघाला क्रिकटप्रेमींनीही शाबासकी दिली. इतकंच नव्हे, तर या विजयासह भारतीय संघानं सेमीफायनलसाठी (WC Semifinal) पात्र ठरत या स्पर्धेमध्ये जेतेपदाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलं. 

आकडेवारी आणि संघाची एकूण कामगिरी पाहायची झाल्यास संघाच्या वाट्याला एकूण 14 गुण आहेत. याच गुणांच्या आणि दमदार कामगिरीच्या बळावर संघानं स्पर्धेच्या सेमीफायनलमध्येही स्थान मिळवलं आहे. या सर्व कामगिरीचं श्रेय संघातील खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षकांसह त्यांच्या सपोर्ट स्टाफलाही जातं. पण, रोहित शर्मा यातही काही खास खेळाडूंना विजयाचं श्रेय देऊन गेला आणि या खेळाडूंनी क्रिकेट रसिकांचीही दाद मिळवली. 

मुंबईतील कामगिरीनं रोहित शर्माचा आनंद परमोच्च शिखरावर...  

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये भारतीय संघानं 50 षटकांमध्ये 8 गडी गमावत 357 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघानं अवघ्या 55 धावा केल्या आणि संघ 20 व्या षटकातच सर्वबाद झाला. या बलाढ्य विजयानंतर रोहित शर्मानं कर्णधार म्हणून भारतीय संघाच्या वतीनं सुरेख प्रतिक्रिया दिली. 

'आपला संघ अधिकृतपणे सेमाफायनलमध्ये गेला हे जाणून मला प्रचंड आनंद झाला. संघानं आतापर्यंत कमाल कामगिरी केली आहे. आम्ही जेव्हा चेन्नईमध्ये स्पर्धेची सुरुवात केली होती तेव्हापासून आमचं एकच लक्ष्य होतं, ते म्हणजे सर्वप्रथम पात्र ठरणं कारण त्यानंतरच आम्ही सहाजिकपणे सेमीफायनल आणि फायनलमध्ये जाऊ शकू. आम्ही या 7 सामन्यांमध्ये ज्या प्रकारे खेळाचं प्रदर्शन केलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे', असं रोहित म्हणाला. 

हेसुद्धा वाचा : बुमराह ग्रेट का आहे? पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रमने गायले गोडवे, म्हणतो...

 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघातील फलंजाच्या कामगिरीचं त्यानं तोंड भरून कौतुक केलं. 'आमच्यासाठी प्रथम फलंदाजी करणं आणि धावसंख्या उभी करणं एक चांगलं आव्हान होतं. या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं श्रेय फलंदाजांना जातं. संघातील खेळाडूंनीही अतिशय प्रभावी कामगिरी करत महत्त्वपूर्ण योगदान दिलं', असंही तो म्हणाला. 

श्रेयस अय्यरच्या पाठीवर शाबासकीची थाप देत तो मानसिकदृष्ट्याच भक्कम असल्याचं म्हणत त्यानं मैदानात येताच नेमकं तेच केलं ज्यासाठी तो ओळखला जातो, असं सांगताना रोहितनं श्रेयसचं विशेष कौतुक केलं. संघातील गोलंदाजांनी सलग दोन सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली असल्याचं म्हणत खेळपट्टीची काहीशी मदत मिळताच ते घातक स्वरुपात गोलंदाजी करतात आणि त्यांनी हा खेळ असाच पुढेही सुरु ठेवावा अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली.