Explosive Comment After Fight Over Virat Kohli: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा त्याच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा सोशल मीडियावरुन त्याने नोंदवलेल्या प्रतिक्रिया केवळ इंग्लंडच्याच नाही तर सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. सध्या तो 'द क्लब पेरिरी फायर' या पॉडकास्टमधून वर्ल्ड कप 2023 बद्दल भाष्य करताना दिसत आहे. सोशल मीडियावरही मायकल वॉनचा भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर आणि इतर क्रिकेटपटूंशी संवाद सुरु असतो. हे क्रिकेटपटू एकमेकांना ज्यापद्धतीने टोमणे मारतात ती डिजीटल शाब्दिक फटकेबाजीही चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते.
सध्या मायकल वॉन चर्चेत असण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीजने केलेली टीका. मायकल वॉनने पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये वाद घातल्याशिवाय समाधान मिळत नाही असं म्हणत आपलं मत व्यक्त केल्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मात्र वॉनने या वादांनंतरही पाकिस्तानी संघ उत्तम कामगिरी करतो असंही म्हटलं होतं. हाफीजने वॉर्नला ऐकवताना डेव्हिड विलीने निवृत्ती घेताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा खेळाडूंबरोबरचा करार हे महत्त्वाचं करणं असल्याचं म्हटलं होतं, याकडे लक्ष वेधलं. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये सोशल मीडियावर वाद झाला.
मोहम्मद हाफीज वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून सातत्याने विराट कोहलीवर टीका करताना दिसत आहे. टीव्हीवरील चर्चासत्रापासून ते सोशल मीडियावरुनही मोहम्मद हाफीज विराटविरुद्ध सातत्याने गरळ ओकताना दिसतोय. बुधवारी झालेल्या इंग्लंडविरुद्ध नेदरलॅण्ड सामन्यादरम्यानही मोहम्मद हाफीजने विराटविरुद्ध बोलण्याची संधी सोडली नाही. विराट हा संघाच्या कामगिरीपेक्षा वैयक्तिक विक्रमांना प्राधान्य देतो असा आरोप मोहम्मद हाफीजने केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ईडन गार्डन्सवरील सामन्यामध्ये विराट कोहलीने 49 वं शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक विक्रमाची बरोबरी केली आहे. कोहलीच्या या खेळीमुळे भारताला 300 हून अधिक धावा करता आल्या आणि नंतर भारताने हा सामना जिंकला. विराट कोहलीच्या या खेळीनंतर मोहम्मद हाफीजने त्याचं कौतुक करण्यासाठी विराटच्या या खेळीत स्वार्थ दिसून येतो असं विधान केलं. मात्र मोहम्मद हाफीजचा माजी संघ सहकारी वाहाब रियाझने हा युक्तीवाद आपल्याला पटत नसल्याचं चर्चासत्रात सांगितलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चर्चासत्रामधील मोहम्मद हाफीजच्या विधानावर, "काही बोलतोय तू मोहम्मद हाफीज!!! भारताने 8 संघांना पराभूत केलं आहे. विराटने आता 49 शतकं झळकावली आहेत. त्याच्या शेवटच्या शतकामुळे संघाला 200 हून अधिक धावांनी विजय मिळवता आला. तुझं बोलणं मूर्खपणाचं आहे," असा टोला वॉननं लागवला आहे.
बुधवारी नेदरलॅण्डविरुद्ध खेळताना इंग्लंडच्या बेन स्ट्रोक्सने वर्ल्ड कपमधील आपलं पहिलं शतक झळकावल्यानंतर मोहम्मद हाफीजने वॉनला टॅग करुन एक पोस्ट केली. बेन स्ट्रोक्सने 108 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना 160 धावांनी जिंकला. इंग्लंडच्या विजयानंतर मोहम्मद हाफीजने ट्विटरवरुन, "बुडत्या जहाजाला वाचवलं बेन स्ट्रोक्सने. दबावाखाली उत्तम शतक झळकावलं. बेन स्ट्रोक्सने जिथे गरज होती तिथे आक्रम खेळी करत संघासाठी जास्तीत जास्त धावा करुन विजय मिळवून दिला. या उदाहरणावरुन स्वार्थी आणि स्वत:चा विचार न करणाऱ्या खेळाडूमधील फरक दिसून येतो मायकल वॉन," अशी पोस्ट केली आहे.
Saviour of the ship @benstokes38 Good under pressure anchoring the innings where required with aggressive intent to get Maximum runs for the team to win at the end. Sheer example to differentiate Selfish vs Selfless approach @MichaelVaughan #ENGvNED #CWC23 pic.twitter.com/ElNmyuK3jv
— Mohammad Hafeez (@MHafeez22) November 8, 2023
मायकल वॉनने बेन स्ट्रोक्सने उत्तम खेळी केल्याच्या मोहम्मद हाफीजच्या विधानावर सहमती दर्शवली मात्र विराटबद्दलच्या आपल्या मतावर मी ठाम असल्याचं इंग्लंडच्या माजी कर्णधाराने अधोरेखित केलं. "बेन स्ट्रोक्सने उत्तम खेळी केली मोहम्मद हाफीज. तशीच विराटनेही केली फक्त ती खेळी कोलकात्यामधील अधिक आव्हानात्मक खेळपट्टीवर आणि अधिक चांगल्या बॉलिंग अटॅकसमोर होती," असं उत्तर मायकल वॉनने दिलं आहे.
Great innings from Stokesy @MHafeez22 .. As was Virats on a difficult pitch in Kolkata against a better attack .. https://t.co/KFpNIafgVK
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 8, 2023
या पोस्टनंतर मायकल वॉनने अन्य एका वेगळ्या पोस्टमध्ये मोहम्मद हाफीजला ट्रोल केलं आहे. मायकल वॉनने एक जुना फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये विराट कोहलीने मोहम्मद हाफीजला बोल्ड केल्याचं दिसत आहे. 2012 मध्ये विराटने मोहम्मद हाफीजला 28 बॉलमध्ये 15 धावांच्या वैयक्तिक स्कोअवर बोल्ड केलं होतं. हाच फोटो पोस्ट करत मायकल वॉनने मोहम्मद हाफीजला डिवचताना, "माझ्यामते मोहम्मद हाफीज तुला विराट कोहलीने बोल्ड केलं होतं. त्यामुळेच तू सातत्याने त्याच्याविरोधात विधानं करत असतो," अशी कॅप्शन दिली आहे. त्याने डोळा मारतानाचे इमोजीही वापरलेत.
Seems to me @MHafeez22 you were bowled by @imVkohli !!! Is this the reason you constantly have a pop at him .. #CWC2023 #India #Pakistan pic.twitter.com/m3BOaCxOB7
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 8, 2023
गुरुवारी सकाळी वॉर्नने विराटने हाफीजची विकेट काढल्याचा व्हिडीओ पोस्ट करत त्याला खोचकपद्धतीने गुड मॉर्निंग म्हणत शुभेच्छा दिल्यात. या व्हिडीओमध्ये हाफीज टी-20 सामन्यात कसोटी खेळताना पकडला गेला असंही म्हटलं आहे.
Morning @MHafeez22 .. Have a great day #India #Pakistan pic.twitter.com/WtK62Lvf01
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 9, 2023
वॉर्नने ही पोस्ट केल्यानंतर काही वेळातच हाफीजने ट्वीटरवरुन एक सूचक पोस्ट केली. 'एखाद्या मूर्ख माणसाला तर्कशुद्ध गोष्ट सांगितल्याचं तो तुम्हालाच मूर्ख म्हणतो,' असं ट्वीट मोहम्मद हाफीजने केलं आहे. हाफीजच्या या पोस्टचा इशारा वॉर्नच्या दिशेने आहे अशी चाहत्यांचं म्हणणं आहे. विराटवरुन या दोन माजी कर्णधारांचा वाद आता अगदी एकमेकांना चाहत्यांसमोर मुर्ख म्हणण्यापर्यंत गेला आहे.
Talk sense to a fool and he calls u foolish….
— Mohammad Hafeez (@MHafeez22) November 9, 2023
आता या दोघांमधील वाद पुढे किती चिघळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.