World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं सेमीफायनलमध्ये धडक मारली आणि या संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं अनेकांना कौतुक वाटलं. क्रिकेट विश्वातील दिग्गजांनीही संघातील खेळाडूंच्या कामगिरीची वाहवा केली. यामध्ये मुख्यत्वं समोर आलेली आणि दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधील काही नावं म्हणजे विराट कोहली, मोहम्मद शमी, रोहित शर्मा. अर्थात यामध्ये संघातील इतर खेळाडूंनाही वगळून चालणार नाही.
यंदाचा वर्ल्ड कप विराट (Virat Kohli, Rohit Sharma) आणि रोहितसाठी खास आहे. विराटविषयीच सांगावं तर, तो फक्त एक खेळाडू म्हणून नव्हे तर क्रिकेटच्या मैदानात आल्यानंतर सर्वांपुढे अनोख्या अंदाजात समोर येणारी एक मनमिळाऊ आणि मजेशीर व्यक्ती म्हणूनही सर्वांच्याच मनाचा ठाव घेत आहे. पण, याच विराटविषयी संघातील एक senior खेळाडू, युवराज सिंग (Yuvraj Singh) यानं मात्र असं वक्तव्य केलं की सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
विराटनं 2008 मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं. पण, त्याआधी युवीनं एकाच ओव्हरमध्ये सलग 6 षटकार मारण्याचा पहिलाच विक्रम केला होता. टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता. क्रिकेट क्षेत्रात त्यानं बरंच नावलौकिकही मिळवलं होतं. विराट संघात आला त्यावेळी युवी आणि विराटचं नातं अतिशय खास होतं. पण, काळ पुढं गेला कर्करोगावर मात करण्यासाठीच्या काळात तो संघापासून दूर राहिला आणि यादरम्यान काही नवी नावं क्रिकेटप्रेमीच्या मनाचा ठाव घेऊन गेली. कधीएकेकाळी क्रिकेट विश्वात युवराजला मिळणारं महत्त्वं विराटलाही मिळू लागलं. हाच विराट सध्या मात्र युवीच्या फारसा संपर्कात नाही.
खुद्द युवीनंच याबाबतचं वक्तव्य TRS पॉडकास्टमध्ये केलं. कोहलीशी संपर्कात आहेस का असं म्हणताच युवी म्हणाला, 'मी त्याला टोकत नाही, कारण तो सध्या फारच व्यग्र दिसतोय. तरुण विराट कोहली चिकू होता... आज मात्र तोच चिकू विराट कोहली झालाय. यामध्ये खरंच खूप फरक आहे.'
युवराज सिंग यावेळी कोहलीच्या फुटबॉल कौशल्याविषयीही खुलेपणानं बोलला. तो क्रिकेट जगतातला ख्रिस्तीयानो रोनाल्डो आहे असं म्हणत त्यानं विराटचा दर्जा किमान शब्दांत सर्वांपुढं आणला. 'आपण फार चांगले फुटबॉलपटू आहोत असं त्याला वाटतं, पण मी त्याच्याहून चांगला आहे. तो नव्या जोमाचा खेळाडू आहे, इथंतिथं पळत असतो... त्याला वाटतं तो ख्रिस्तीयानो रोनाल्डो आहे, पण तो नाहीये. पण क्रिकेटमध्ये तो रोनाल्डो आहे असंच म्हणावं लागेल. फिटनेस आणि एकाग्रतेच्या बाबतीचही तो त्याच स्तरावर आहे' असं सांगत युवीनं विराटसोबतचं नातं सर्वांपुढे आणलं.
विक्रमवीर विराट....
विराट कोहलीनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केल्याचं क्रिकेटप्रेमींनी पाहिलं. याच विराटनं सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील 49 शतकी खेळीच्या विक्रमांची बरोबरीसुद्धा केली. आता येत्या काळात त्याच्या कामगिरीकडून क्रिकेटप्रेमींच्याही अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.