युवराज सिंग मैदानात परतण्याची शक्यता, या स्पर्धेत दिसणार!

भारताचा माजी दिग्गज खेळाडू सिक्सर किंग युवराज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 8, 2020, 07:56 PM IST
युवराज सिंग मैदानात परतण्याची शक्यता, या स्पर्धेत दिसणार! title=

मेलबर्न : भारताचा माजी दिग्गज खेळाडू सिक्सर किंग युवराज पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे. युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली आहे. युवराजचा मॅनेजर जेसन वॉनने याबाबतचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाही युवराजला क्लब शोधून देण्यासाठी मदत करत आहे. 

आतापर्यंत कोणताच खेळाडू बिग बॅश लीगमध्ये खेळलेला नाही. कारण बीसीसीआय सक्रीय खेळाडूंना परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. युवराजने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमनेही युवराज सिंगला सोडून दिलं. त्यामुळे युवराजचा परदेशातल्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.

युवराज सिंगसाठी फ्रॅन्चायजीचा शोध सुरू आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमची मदत करत आहे, असं युवराजचा मॅनेजर जेसन वॉनने सांगितलं. बिग बॅश लीगमध्ये भारतीय खेळाडू सामील होणं अविश्वसनीय असेल, असं ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनचा अध्यक्ष शेन वॉटसन म्हणाला. 

'भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे टी-२० खेळाडू आहेत, जे भारतासाठी खेळू शकत नाहीयेत. बिग बॅश लीग आणि अन्य स्पर्धांसाठी हे खेळाडू उपलब्ध होऊ शकतात. जर असं झालं तर खूप फरक पडेल,' अशी प्रतिक्रिया शेन वॉटसनने दिली. 

भारताला २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारा युवराज २०१७ नंतर भारताकडून एकही मॅच खेळला नाही. युवराजने ३०४ वनडे मॅचमध्ये ८.७०१ रन केले आणि १११ विकेटही घेतल्या. याचसोबत त्याने ४० टेस्ट आणि ५८ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचही खेळल्या.