Maruti Suzuki : जगभरात कैक वर्षांपासून दमदार कामगिरी करणाऱ्या आणि ऑटो क्षेत्रामध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मारुती सुझुकीच्या कोणत्या कार मॉडेलला कारप्रेमींची पसंती मिळताना दिसते. सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आणि त्यांना अपेक्षित असणाऱ्या सर्वच सुविधा मारुतिच्या कारमध्ये मिळतात. ज्यामुळं या कारला अनेकांचंच प्राधान्य असतं. मारुतीचे एक ना अनेक मॉडेल कारप्रेमींच्या प्राधन्यक्रमाच्या यादीत अग्रस्थानी असून त्यातलंच एक नाव म्हणजे, इको.
कमालीची प्रसिद्धी मिळणाऱ्या या मॉडेलला खरेदी करणाऱ्यांपुढे आणि ज्या कारधारकांकडे मारुति इको आहे अशा सर्वांपुढं आता एक नवं संकट उभं राहताना दिसत आहे. कारण, या कारमधील एका स्पेअर पार्टवर चोरट्यांची नजर पडली आहे. मारुतिच्या इको मॉडेलच्या कारमध्ये असणाऱ्या या पार्टा चांगला भाव मिळत असल्यामुळं त्याची चोरी होण्याचं प्रमाणही वाढल्याचं म्हटलं जात आहे. पण, या पार्टला इतकी रक्कम का मोजली जात आहे?
Maruti Eeco ला चोरीला जाणारा हा भाग आहे कॅटालिक कन्वर्टर. या स्पेअर पार्टसाठी सोन्याइतकी रक्कम मोजली जात आहे. कारण, यामध्ये पॅलेडियम, प्लॅटिनम आणि रोडियम यांसारखे मौल्यवान धातू वापरण्यात आले आहेत. या धातूंची किंमत मोठी असून, त्यांच्यासाठी बाजारात तितकीच मोठी रक्कम मोजलीसुद्धा जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या धातूंना मोठी मागणी असून, या पार्टमध्ये असणारे हे धातू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळं चोरटे हा पार्ट चोरून स्क्रॅप डिलरना विकताना दिसत आहेत.
मारुती Eeco मध्ये असणारा हा स्पेअर पार्ट कारमधून निघणाऱ्या हानिकारत वायूला उत्सर्जित करण्यासाठी वापरला जातो. तो कारच्या एग्जॉस्ट सिस्टीमचाच एक भाग असतो आणि कार्बन मोनोऑक्साइड (CO), नाइट्रोजन ऑक्साइड (NOx) आणि हायड्रोकार्बनचं प्रमाण कमी करतो. या पार्टमध्ये असणारे धातू कारमधील प्रदूषकांना कमी हानिकारक वायूंमध्ये रुपांतरित करण्याचं काम करतात असं सांगितलं जातं.