नवी दिल्ली : नव्या वर्षात Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
ई-वॉलेट कंपनी पेटीएम आपल्या ग्राहकांच्या पेटीएम खात्यात जमा असलेल्या एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ट्रान्सफर करेल.
खास बाब म्हणजे ग्राहकांना या एफडी (फिक्स्ड डिपॉझिट)वर ६.८५ टक्के वर्षाला व्याज मिळणार आहे. म्हणजेच कुठल्याही बँकेच्या एफडी व्याजदरा इतका किंवा त्यापेक्षा अधिक पेटीएम आपल्या ग्राहकांना व्याजदर देणार आहे.
या सुविधेची खास बाब म्हणजे युजर्स आपली रक्कम हवी तेव्हा काढू शकणार आहेत. यासाठी कुठल्याही प्रकारची अट ठेवण्यात आलेली नाहीये.
आपल्या ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी)ची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकने इंड्सइंड बँकेसोबत करार केला आहे. ग्राहकाकडून जमा करण्यात आलेली रक्कम एक लाखांपेक्षा अधिक झाल्यास आपोआप ती रक्कम एफडीमध्ये बदलली जाईल असं कंपनीने म्हटलं आहे.
पेटीएमने स्पष्ट केलं आहे की, ग्राहक आपली ही रक्कम कधीही काढू शकतात. यासाठी ग्राहकांकडून कुठल्याही प्रकारचा दंड किंवा चार्ज घेतला जाणार नाहीये. तसेच एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेवर ६.८५ टक्के व्याजही मिळणार आहे.
पेटीएमने आपल्या युजर्ससाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. कंपनीकडून वरिष्ठ नागरिकांनासाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत वरिष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर मिळणार आहे. जर ग्राहक मॅच्योरिटी काळापूर्वी वरिष्ठ नागरिक झाल्यास त्याचं अकाऊंट आपोआप सिनिअर सिटीजन स्किममध्ये ट्रान्सफर होईल अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.
वरिष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर मिळणार आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या एमडी रेनू सत्ती यांनी सांगितले की, बहुतांश भारतीय नागरिक हे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय निवडतात. आमच्या स्किममध्ये त्यांना कागदपत्रांची अडचण येणार नाही. तसेच गुंतवणूक केलेली रक्कम कधीही आणि कुठल्याही चार्जशिवाय ग्राहक काढू शकतात.