कोरोना व्हायरसमुळे फेसबुक, इन्स्टाग्रामचा महत्त्वाचा निर्णय

ट्विटरवरुन केली निर्णयाची घोषणा...

Updated: Mar 11, 2020, 10:39 AM IST
कोरोना व्हायरसमुळे फेसबुक, इन्स्टाग्रामचा महत्त्वाचा निर्णय title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामने शनिवारी आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर, मेडिकल फेस मास्क विकणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. फेसबुकवर ट्रस्ट/ इंटिग्रिटी टीमचं (जाहिराती आणि व्यावसायिक उत्पादनांसाठी) नेतृत्व करणाऱ्या रॉब लीथर्न यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची घोषणा केली.

रॉब लीथर्न यांनी 'आम्ही मेडिकल फेस मास्क विकणाऱ्या जाहिराती आणि प्रोडक्ट लिस्टिंगवर बंदी घालत आहोत. कोविड-१९ वर आमची नजर आहे. या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा कोणी फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळल्यास, आम्ही आमच्या धोरणांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणार असल्याचं,' लीथर्न यांनी ट्विट केलं आहे. 

इस्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनीदेखील, रॉब लीथर्न यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

एडम मोसेरी यांनी, 'पुरवठा कमी आहे आणि किंमती जास्त आहेत. आम्ही या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेत असलेल्या लोकांच्या विरोधात आहोत. येत्या काही दिवसांत आम्हीदेखील याची सुरुवात करणार असल्याचं,' त्यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरस संबंधित शोधांसह या माध्यमातून, जागतिक आरोग्य संघटनेकडून आवश्यक सूचना असलेला पॉपअप किंवा माहिती आपोआप येईल याबाबतही फेसबुकने घोषणा केली आहे.

इतर कंपन्याही महागाई आणि आरोग्यासंबंधी चुकीची माहिती रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

टेक क्रंचने दिलेल्या वृत्तानुसार, 'अ‍ॅमेझॉन' हँड सॅनिटायझर्स आणि फेस मास्क यांसारख्या उत्पादनांवर अधिक किंमतीच्या ऑफर हटवण्याचं काम करत आहे. तर 'ईबे'नेही एन९५ आणि एन१०० फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स आणि अल्कोहल वाईप्स या उत्पादनांच्या लिस्टिंगवर बंदी घातली आहे.