'भाजपच्याच जास्त जागा निवडून येतील, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळेल'

आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही

Updated: Sep 10, 2019, 07:33 AM IST
'भाजपच्याच जास्त जागा निवडून येतील, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळेल' title=

ठाणे: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच जास्त जागा निवडून येतील. परिणामी मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहील व शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होईल, असे भाकीत केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी वर्तविले. ते सोमवारी उल्हानसगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले की, जागावाटपाच्यावेळी अडीचअडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. ज्याच्या जास्त जागा येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल. भाजपच्याच जास्त जागा येतील, असा आमचा अंदाज आहे. 

त्यामुळे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळेल. मात्र, त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले. 

प्रकाश आंबेडकरांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी सेनेमुळेच होईल- प्रकाश आंबेडकर

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणे, ही उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांची जबाबदारी आहे. यासाठी त्यांनी झटायला हवे. नाहीतर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. 

दरम्यान, गणपती विसर्जन झाल्यानंतर जागावाटपाची अंतिम चर्चा होईल. आम्ही २५ जागांची मागणी केली असून आम्हाला किमान १० जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. आमच्या संपर्कात सध्या कुठलेही मोठे नेते नाहीत. पण एकदा आमच्या पाच ते सहा जागा निवडून आल्या की पुढच्या वेळी आमच्याही पक्षात इनकमिंग होईल, असे आठवले यांनी सांगितले. 

जागावाटपावरून महायुतीच्या घटकपक्षांची धुसफूस वाढण्याची शक्यता