'डोंबिवलीचा बादशाह' प्रत्यक्षात बनावट नोटांचा व्यापारी? सुरेंद्र पाटीलच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Dombivli Crime : बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र पाटील याच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

आकाश नेटके | Updated: Nov 29, 2023, 11:19 AM IST
'डोंबिवलीचा बादशाह' प्रत्यक्षात बनावट नोटांचा व्यापारी? सुरेंद्र पाटीलच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर title=

Crime News : पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून रील व्हायरल करणाऱ्या बिल्डर सुरेंद्र पाटील याला खंडणी विरोधी पथकाने डोंबिवलीजवळील खंबाळपाडा रोडवरील टाटा नाका परिसरातून अटक केली होती. बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या सुरेंद्र पाटील याच्याकडून चौकशीत आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने दोन देशी बनावटीच्या पिस्तूल आणि सात गोळ्यांसह सुरेंद्र पाटीलला 26 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. इन्स्टाग्रामवर डोंबिवलीचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्र पाटील याच्या चौकशीनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे

रामायण मालिकेत लवची भूमिका साकरणाऱ्या सुरेंद्र पाटीलने परवानाधारी बंदुकीचा दुरूपयोग केल्याचा आरोप करण्यात आला होता. दुसरीकडे, पोलीस असल्याचे भासवून सुरेंद्र पाटीलची 40 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र पाटील बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे. सुरेंद्र पाटील 40 लाखांत 1 कोटी 60 लाख रुपयांच्या बनावट नोटा खरेदी करण्यासाठी मुरबाडला गेला होता. मुरबाडमध्ये सुरेंद्र पाटील याच्यासमोरच पोलिस असल्याचे भासवून 5 जणांनी फिल्मी स्टाईलमध्ये त्याच्याकडून 40 लाख रुपये लुटले. यानंतर मानपाडा पोलिसांनी सुरेंद्रला विना परवाना शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. 

डोंबिवली, मानपाडा परिसरात राहणारा सुरेंद्र पाटील याचे इन्स्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तो एका व्यक्तीच्या संपर्कात आला, ज्याने सांगितले की आम्ही बनावट नोटा छापतो. त्यानंतर सुरेंद्र पाटीलने त्याच्याकडून 40 लाखांच्या बदल्यात 1.5 कोटी रुपयांच्या बनावट नोटा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सुरेंद्र त्याच्या मर्सिडीज कारने मुरबाडला गेला होता. यावेळी त्याने स्वत:च्या सुरक्षेसाठी दोन विना परवाना बंदुका सोबत ठेवल्या होत्या. बनावट नोटांची वाट पाहत असतानाच तिथे काहीजण पोलीस असल्याची बतावणी करत तेथे आले. त्यांनी सुरेंद्र पाटील याच्याकडून 40 लाख रुपये घेतले आणि तिथून पळ काढला. यानंतर सुरेंद्र पाटील याने मानपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

आपल्याकडील 40 लाख रुपये लुटले गेल्याची माहिती सुरेंद्र पाटीलने पोलिसांना दिली होती. ठाणे खंडणी विरोधी पथकाने याचा अधिक तपास करत त्यांनी सुरेंद्र पाटीलचीही चौकशी सुरु केली होती. चौकशीत त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने स्वप्नील जाधव, आदेश भोईर, सचिन जाधव आणि अक्षय गायकवाड या चौघांना अटक केली. पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 14 लाख 35 हजार रुपये जप्त केले आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x