Budget 2019: मोदी सरकारचा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता

मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या भात्यातील प्रमुख अस्त्रे काढून घेतली आहेत.

Updated: Feb 1, 2019, 01:47 PM IST
Budget 2019: मोदी सरकारचा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता title=

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत मांडण्यात आला. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी लक्ष वेधून घेणारा ठरला. या अर्थसंकल्पात सरकारने अपेक्षेप्रमाणे शेतकरी, लहान व्यापारी, नोकरदार आणि गरीब वर्गाला सर्वतोपरी खूश करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून हे सर्व घटक आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवतील. यासाठी या वर्गावर अनुदान आणि सवलतींची खैरात करण्यात आली आहे. पीयूष गोयल यांनी अत्यंत संयत आणि नेमकेपणाने मांडलेला हा अर्थसंकल्प गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. तब्बल पावणेदोन तासांच्या भाषणात गोयल यांनी यूपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारचे यश अगदी मुद्देसूदपणे अधोरेखित केले. शेतकरी, सामान्य करदाते, असंघटित कामगार आणि गरीब वर्गासाठी करण्यात आलेल्या प्रत्येक महत्त्वपूर्ण घोषणेचे सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवून स्वागत केले. यावेळी विरोधी गोटातील शांतता आणि पडलेले चेहरे खूप काही सांगून जाणारे होते. अर्थसंकल्पातील लोकप्रिय घोषणांमुळे मोदी सरकारने निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या भात्यातील प्रमुख अस्त्रे काढून घेतली आहेत. त्यामुळे आता विरोधकांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे अनपेक्षित डाव खेळून विरोधकांना बॅकफूटवर ढकलले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अनुपस्थितीचा फटका बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. विरोधकांच्या वातावरणनिर्मितीमुळे सरकारवर कुठेतरी दबाव निर्माण झाला होता. मात्र, पीयूष गोयल यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यांनी ज्या आत्मविश्वासाने आणि नेमकेपणाने अर्थसंकल्प मांडला, त्यामुळे विरोधकांना फारसा प्रतिवाद करण्याची संधी मिळाली नाही. विरोधकांची तुरळक घोषणाबाजी सोडली तर सभागृहात भाजपच्या खासदारांकडून मोदीनामाचा जयघोष सुरु होता. अर्थसंकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या घोषणेनंतर तर सभागृहात बराचवेळ 'मोदी-मोदी' घोषणा गुंजत होत्या. यावेळी विरोधकांच्या गोटात पसरलेली चिडीचूप शांतता आगामी निवडणुकीचा ट्रेंड सेट करणारी ठरू शकते.