श्रीकांत राऊत, यवतमाळ : यवतमाळमध्ये उत्तर प्रदेश एटीएसने कारवाई करीत धीरज जगताप देशमुख या व्यक्तीला अटक केली आहे. मुस्लिम धर्मांतरण रॅकेटशी संबंधावरून ही कारवाई झाली असल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनी मध्ये धीरजचे घर असून या कारवाईने त्याच्या कुटुंबियांना देखील धक्का बसला आहे.
देशभर खळबळ उडवून देणाऱ्या मुस्लिम धर्मांतरण रॅकेट चे यवतमाळ कनेक्शन उघडकीस आले असून जिल्ह्यातील पुसद नंतर आता यवतमाळ शहरातूनही एका व्यक्तीला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एटीएस कडून अटक झाली आहे. धीरज गोविंद जगताप देशमुख असे अटक झालेल्या युवकाचे नाव असून तो पुसदच्या वसंत नगर भागात राहणाऱ्या डॉक्टर फराज शहा सोबत धर्मांतराचे काम करीत असल्याची माहिती आहे.
डॉ. फराज याला उत्तरप्रदेश एटीएसने दीड महिन्यापूर्वीच अटक केली आहे. पॉलिटेक्निकपर्यंत पुसद मधून शिक्षण घेतलेला धीरज सुरवातीला पुण्यात खाजगी कंपनीत नोकरी करीत होता, त्यानंतर त्याने नोकरी सोडून स्वतंत्र कंत्राटदारी सुरु केली. त्याचे वडील पोलीस खात्यात तर आई नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षिका म्हणून निवृत्त झाले आहे. त्याचा विवाह झाला असून त्याला एक मुलगी देखील आहे. मात्र तो जास्त वेळ घरी राहत नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन माहेरी निघून गेली.
चार महिन्यापूर्वी तो वाढदिवसानिमित्त घरी होता मात्र त्यानंतर आई वडील व बहिणींशी त्याचा संपर्क नाही. धीरज ला झालेल्या अटकेमुळे आम्हालाही धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
शुक्रवारी यवतमाळातील स्थानीक एटीएसच्या पथकाने धीरजच्या घरी जाऊन त्यांना माहिती दिली. धीरज हा धर्मांतराच्या प्रकियेत सक्रिय असून तो व्हाट्सग्रुप देखील चालवीत असल्याची माहिती आहे. सुरवातीला अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा असलेला धीरज दहा वर्षांपूर्वीपासून अचानक नास्तिक झाला होता. त्याचे मित्रमंडळ देखील विशिष्ट समुदायाचे होते. त्याच्या वागण्या बोलण्यात व विचारातही फरक होता. घरी न राहता तो गावाबाहेरच जास्त फिरस्तीवर असायचा त्यामुळे तो नेमके काय काम करायचा ह्याची कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनाही माहिती नव्हती.
मुस्लिम धर्मांतरण रॅकेट मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या पुसद नंतर आता यवतमाळ शहरातल्या युवकावरही कारवाई झाल्याने ह्या प्रकरणात आणखी कुणी गुंतलेले आहे का? किंवा जिल्ह्यात त्यांनी अशा काही कारवाया केल्या का? हे एटीएस तपासातूनच पुढे येऊ शकेल.