अमर काणे, झी मीडिया, नागपूर : प्रेमाच्या नात्यामध्ये अनेकदा मतभेद होतात. कित्येकदा गैरसमजांमुळं नात्याला तडाही जातो. प्रेमाच्या याच नात्यात अनेकदा वाद किंवा गैरसमज इतके विकोपास जातात की परिस्थिती हाताबाहेर जाऊन चुकीच्या प्रवृत्ती बळावत जातात. नागपुरात सध्या अशाच एका घटनेमुळं एकच खळबळ माजली आहे. कारण, प्रेमाच्या नात्यात असणाऱ्या मतभेदामुळं एका प्रियकराच्या कृतीनं अनेकांना फटका बसला आहे.
(Nagpur News) नागपुरात प्रेयसीने ब्रेकप करून, बोलणं बंद केल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसी काम करत असलेल्या दुकानाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत चट्टे असं दुकानाला आग लावणाऱ्या या कथित प्रेमवीर महाशयांचे नाव आहे. आठवड्याभराच्या तपासानंतर तहसील पोलिसांनी सीसीटीव्हीच्या (CCTV Footage) आधारे तपास करत आरोपीला अटक केली आहे.
शहरातील व्यापारी पेठ इतवारी येथील बोहरा मशीद गल्ली परिसरामध्ये रितेश मखिजा यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. रितेश 30 एप्रिलला रात्री दुकान बंद करून घरी परतले होते. 1 मे रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना दुकानातून धूर येत असल्याचं सांगत एका गृहस्थांचा फोन आला. त्यानंतर रितेश यांनी त्वरेने दुकानाकडे धाव घेतली.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत दुकानात लागलेली आग विझवली. मात्र या आगीत रितेश यांच्या दुकानातील लाखोंचं साहित्य जळून खाक झालं होतं, या घटनेमध्ये त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर तहसील पोलिसांनी तपास सुरू केला. तपासातून समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती अंगावर शाल पांघरून पहाटेच्या सुमारास दुकानाच्या शटरखाली पेट्रोल टाकून आग लावत असल्याचं चित्रित झाल्याचं आढळलं.
आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांना तपासात ही व्यक्ती प्रशांत चट्टे असल्याचं लक्षात आलं. दुकानातील कर्मचारी आणि परिसरातील लोकांकडे पोलिसांनी त्याबाबत चौकशी सुरू करताच हा तरुण त्या दुकानात काम करणाऱ्या एका तरुणीचा प्रियकर असल्याची बाब समोर आली. सदर तरुणीनं/ प्रेयसीने त्याच्यापासून दुरावा पत्करला होता. शिवाय त्याच्यासोबत बोलणं बंद केलं होतं. तरुणीला धडा शिकवण्यासाठीच्या वृत्तीतून आरोपी प्रेमवीर प्रशांत चट्टे यानं हे टोकाचं पाऊल उचललं. यामध्ये दुनकानमालकांना मात्र लाखोंच्या नुकसानाचा सामना करावा लागल्याचं वास्तव तपासातून समोर आलं.