कोल्हापूर: दूधपुरवठा रोखायला मुंबई पाकिस्तानात आहे काय?, असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना केला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. दूध दराच्या प्रश्नावरुन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. आम्ही कायदा हातात घेणार आहोत, सरकारने काय करायचे आहे ते करावे, असा इशारा शेट्टींनी सरकारला दिला होता. सरकारने लक्ष न दिल्याने दुधाचे दर पडत गेल्याचा आरोपही यावेळी शेट्टींनी केला. शेट्टींनी दिलेल्या या इशाऱ्याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा पाटील यांनी म्हटले की, मुंबईचे दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे काय? दूध रोखणे, भाजीपाला फेकणे ही शेतकरी आंदोलनाची पद्धत नाही. शेतकऱ्याच्या घरातील दूध, भाजीपाला रस्त्यांवर फेकण्यापेक्षा स्वत:च्या घरातील दूध, भाजीपाला फेकावा. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असला तरी त्यातून सामान्य जनतेला त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास १६ जुलैपासून एक थेंब दूध विकले जाणार नाही, असा इशाराही शेट्टींनी दिलाय. उपद्रवमूल्य दाखवल्याशिवाय सरकारला जाग येत नाही असं सांगत त्यांनी यावेळी मुंबईकरांना होणाऱ्या संभाव्य त्रासाबद्दल माफीही मागितलीय. तसंच जे जबरदस्तीने दूध आणतील त्यांना शेतकरी प्रसाद देतील असाही इशारा शेट्टींनी दिलाय. त्यामुळे आता या वादाचे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.