यशाला खूप बाप आणि पराभवाला खूप सल्लागार असतात- राज ठाकरे

शरद पवार यांना आता 'चाणक्य' आणि 'बापमाणूस' अशा विशेषणांनी गौरविले जात आहे.

Updated: Dec 21, 2019, 01:06 PM IST
यशाला खूप बाप आणि पराभवाला खूप सल्लागार असतात- राज ठाकरे title=

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या आणि नंतरच्या चित्रात खूपच तफावत आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना 'चाणक्य' आणि 'बापमाणूस' अशा विशेषणांनी गौरविले जात आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी म्हणजे २३ ऑक्टोबरला अशी परिस्थिती नव्हती. साताऱ्यात भर पावसात झालेली सभा आणि २४ तारखेला निकाल लागल्यानंतर अनेकांनी पवारांचे कौतुक करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे निकालापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही आताप्रमाणे बोलले जात नव्हते. त्यामुळे या परिस्थितीचे वर्णन म्हणजे 'यशाला खूप बाप असतात आणि पराभवाला खूप सल्लागार असतात', असेच करावे लागेल, असे राज यांनी म्हटले. 

देशावर बाहेरची ओझी नको; भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे- राज ठाकरे

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्यावरून राजकीय पक्षांवर टीकाही केली. निवडणुका झाल्यापासून मी काहीच बोललो नाही. जे काही झाले ते पाहून माझीच नव्हे तर महाराष्ट्राची वाचा खुंटली होती. निवडणुकीसाठी पक्षांतर केलेल्यांना पाडून मतदारांनी चांगला कौल दिला होता. मात्र, यानंतर महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जे काही केले तो मतदारांचा अपमान आहे. सत्तेसाठी प्रतारणा करणे ही योग्य गोष्ट नाही. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांमधील मतदानावर त्याचा परिणाम दिसून येईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. तसेच या सरकारचा हनिमून पिरियड संपल्यानंतर मी बोलेन, असेही त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात २३ जानेवारीला मुंबईत मनसेचे पहिले अधिवेशन पार पडणार आहे.