Lockdown: 'पुणेकरांनो, काय खरेदी करायची असेल ती आत्ताच करुन घ्या'

लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसांत निर्बंध हे अत्यंत कडक असतील. 

Updated: Jul 10, 2020, 05:06 PM IST
Lockdown: 'पुणेकरांनो, काय खरेदी करायची असेल ती आत्ताच करुन घ्या'

पुणे: कोरोना व्हायरसच्या Coroanvirus वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, सोमवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १४ जुलैपासून १० दिवसांसासाठी पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्यात येईल. या काळात नागरिकांवर अत्यंत कडक निर्बंध लादण्यात येतील. या काळात भाजीपालाही उपलब्ध नसेल. त्यामुळे पुणेकरांना काय खरेदी करायची असेल ती आत्ताच करुन घ्यावी, अशी सूचना पुणे महानगरपालिकाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. 

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर १० दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाविषयी माहिती देताना पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडसह काही ग्रामीण भाग लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसांत निर्बंध हे अत्यंत कडक असतील. केवळ दूध विक्रेते, औषधांची दुकाने आणि दवाखानेच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून पास दिले जातील. या काळात भाजीपालाही उपलब्ध होणार नाही. १८ जुलैनंतर लॉकडाऊन काहीप्रमाणात शिथील होईल. त्याबाबतच्या सूचना पुढील दोन दिवसांत दिल्या जातील, अशी माहिती दीपक म्हैसकर यांनी दिली. 

तर पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनीही नागरिकांना हा लॉकडाऊन गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला. नागरिकांना कुठे बाहेर जायचे असेल तर आत्ताच जाऊन यावे. काही खरेदी करायची असेल तर आधीच करुन घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. पुणे जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८०३ रुग्णांची नोंद झाली. तर काल दिवसभरात सर्वाधिक ३५ मृत्यू झाला. जिल्ह्यात मृतांचा आकडा ९७९ वर पोहोचला आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत सलग एक हजारांच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.