Pakistan Bus Fire : पाकिस्तानात (Pakistan) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्ते अपघातात बसला (Bus Accident) लागलेल्या आगीमुळे तब्बल 30 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हा भीषण अपघात झाला आहे. कराचीहून (karachi) ही बस इस्लामाबादला जात होती. मात्र बसला आग लागून 30 जणांचा मृत्यू झाला. अपघात झालेल्या बसमध्ये 40 हून अधिक लोक प्रवास करत होते. अपघातानंतर जळत्या बसचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले असून, त्यात आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या बसमध्ये आग लागली ती इस्लामाबादहून कराचीला जात होती. मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या पथकांच्या म्हणण्यानुसार, बस पिंडी भटियानजवळ पोहोचली तेव्हा हा अपघात झाला. पिंडी भटियानजवळ पोहोचताच बसमध्ये मोठी आग लागली. काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला होता. बसमधून आगीच्या उंचच उंच ज्वाळा उठत होत्या. आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण बसचा केवळ सांगाडाच उरला.
मिळालेल्या माहितीनुसार, आधी बसचा अपघात झाला त्यानंतर काही क्षणात बसने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये मोठी आग लागली. या आगीत 30 प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर प्रवाली हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
पोलिलांनी या अपघाताचे नेमकं कारण सांगितलं आहे. पोलिसांनी सांगितले की, "बस भरधाव वेगाने जात होती. तेव्हा तिची पिक-अप व्हॅनला धडक बसली. त्या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल भरले होते. यामुळेच धडक दिल्यानंतर बसमध्ये मोठी आग लागली. हा अपघात इतका भीषण होता की अनेकांचा जागीच मृत्यू झाला."
दरम्यान, जखमींना पिंडी भटियान रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधिकारी डॉक्टर फहाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक लागल्यानंतर काही वेळातच बसला आग लागली. तसेच जखमींपैकी बहुतेकांची प्रकृती चिंताजनक आहे. डिझेलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला बसने धडक दिल्याने हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरातील आजूबाजूच्या लोकांनी बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला होता.