VIDEO : लाटांच्या तडाख्यानंतर भरसमुद्रात उलटली प्रवाशांची बोट; पाण्यात उडी मारताच...

Viral Video : बहमासला भेट देणाऱ्या काही प्रवाशांसोबत काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बोट भरसमुद्रात उलटल्याने मोठा अपघात घडला होता.

आकाश नेटके | Updated: Nov 18, 2023, 01:10 PM IST
VIDEO : लाटांच्या तडाख्यानंतर भरसमुद्रात उलटली प्रवाशांची बोट; पाण्यात उडी मारताच... title=

Viral Video : कॅरेबियामधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बहामसमध्ये मोठा अपघात घडला आहे. बहामसमध्ये नासाऊच्या उत्तरेकडील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या ब्लू लॅगून बेटाकडे जाणारी फेरी बोट भर समुद्रात उलटली. लाटांचा सामना करु न शकल्याने प्रवाशांनी भरलेली ही बोट समुद्रातच उलटली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बोट उलटल्याने अनेक प्रवासी समुद्रात फेकले गेले होते. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

बहामसमधील ब्लू लॅगून बेटाच्या विलोभनीय सौंदर्यामुळे त्याची तुलना 'स्वर्गा'शी केली जाते. पण या 'स्वर्गात' पोहोचण्याचा मार्ग या बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नरक जाण्याचा मार्ग बनणार असल्याचे माहिती नव्हते. या अपघातात कोलोरॅडो येथील एका 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, सुमारे 100 जणांना घेऊन जाणारी ही डबल डेकर बोट अर्ध्या तासाच्या प्रवासानंतरच समुद्रात उलटली. या भयानक घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सर्व पर्यटक रॉयल कॅरेबियन लक्झरी क्रूझ बोटीतून  बोटीतून ब्लू लगून नावाच्या बेटावर जात होते. मात्र वाटेतच त्यांची बोट उलटली. हा अपघात 14 नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटकांना ब्लू लगून बेटावर नेले जात असताना हा अपघात घडला. या अपघातात अमेरिकेतील रहिवासी असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हायरल व्हिडिओमध्ये घाबरलेले प्रवासी लाईफ जॅकेट घालून बुडणाऱ्या बोटीतून पाण्यात उडी मारताना दिसत आहेत. बोटीचा तोल गेल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारण्यास सुरुवात केली. पाण्यातील लोकांना मदत करण्यासाठी जवळपासच्या बोटीही पुढे आल्या. मात्र दुर्दैवाने या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

ब्लू लॅगून आयलंडवरील अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. " अपघातानंतर प्रवासी आणि पाच कर्मचारी सदस्यांना शोधून बेटावर आणण्यात आलं आहे. तर दोन प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. रॉयल बहामा डिफेन्स फोर्स, ब्लू लगून आणि इतर जहाजांनी लोकांना किनार्‍यावर आणण्यात मदत केली. याशिवाय स्थानिक अधिकाऱ्यांनीही या घटनेची माहिती अमेरिकन दूतावासाला दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.