Russia-China Nuclear Power Plant On Moon : आता थेट चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. चीन आणि रशिया एकत्र येवून चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत. यावर दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. 2033-35 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे दोन्ही देशाचे टार्गेट आहे. चीन आणि रशियाच्या या प्लान संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकतो.
रशियन स्पेस एजन्सी Roscosmos चे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी या प्रकल्पबाबत माहिती दिली. 2033-35 मध्ये रशिया आणि चीन संयुक्तपणे चंद्राच्या पृष्ठभागावर अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत. हा अणुऊर्जा प्रकल्प स्वयंचलित पद्धतीने उभारला जाणार आहे. म्हणजेच प्रत्यक्षात मानवाला चंद्रावर न पाठवता पृथ्वीवरुनच चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. रशिया झ्यूस नावाचे रॉकेट विकसीत करणार आहे. हे रॉकेट अणुऊर्जेवर चालणारे आहे. झ्यूस हे कार्गो रॉकेट असेल. विशेष म्हणजे हे रॉकेट पूर्णपणे स्वयंचलित असेल. हे रॉकेट ऑपरेट करण्यासाठी मानवाची गरज पडणार नाही. रॉकेट लाँच केल्यानंतर लाँचिंग आणि रूट मॅन्युव्हरिंगवर लक्ष ठेवले जाणार आहे. 2021 मध्येच रशिया आणि चीनने चंद्रावर एकत्रितपणे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्लानिंग सुरु केले होते. यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितरीत्या चंद्रावर एक वैज्ञानिक स्टेशन तयार करण्याचा रोडमॅप तयार केला होता. 2035 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे टार्गेट आहे.
अणुऊर्जा प्रकल्प उभारताना जंपिंग रोबोट्स आणि काही स्मार्ट मिनी-रोव्हर्स चंद्रावर पाठवले जाणार आहेत. रोव्हर आणि रोबोट्सच्या मदतीने चंद्रावरील पृष्ठभागाचा अंदाज घेतला जाणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे अंतराळात पाठवले जाणार नाहीत असे बोरिसोव्ह यांनी स्पष्ट केले आहे.
भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत स्थापन केली जाणार आहे. चंद्रावर मानवी वस्ती स्थापन करण्यासाठी अनेक देश विविध प्रयोगांच्या माध्यमातून संशोधन करत आहेत. याअनुषांगाने चंद्रावर लागणारी उर्जेची गरज लक्षात घेता चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली जात आहे. सध्या चंद्रावर लँड होणारे सर्व लँडर हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऊर्जा मिळतात. मात्र, चंद्रावर 14 दिवस अंधार आणि 14 दिवस प्रकाश असतो. यामुळे अंधार पडल्यानंतर ऊर्जा मिळवणे जवळपास अशक्य होवून जाते. यामुळेच भारताची चांद्रयान 3 मोहिम चंद्रावर रात्र झाल्यामुळे संपुष्टात आली. या अणुऊर्जा प्रकल्पामुळे चंद्रावर 24 तास ऊर्जा उपलब्ध होईल असा दावा चीन आणि रशियाने केला आहे.