चीनची अण्वस्त्र हल्ल्याची तयारी, व्हिडिओ जारी करत दिली धमकी

आता चीन जगाला अणुबॉम्बच्या संकटात ढकलण्याचे काम करत आहे. तैवानच्या मुद्यावरून अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

Updated: Jul 21, 2021, 07:41 AM IST
चीनची अण्वस्त्र हल्ल्याची तयारी, व्हिडिओ जारी करत दिली धमकी

बीजिंग : जगाला कोरोना (Coronavirus) साथीच्या आजारात ढकलणारा चीन (China) आता अणुबॉम्ब हल्ल्याची तयारी करत असल्याचे पुढे आले आहे. तैवानच्या (Taiwan) मुद्यावरून चीनने जपानवर अण्वस्त्र हल्ला (Nuclear Attack)  करण्याची धमकी दिली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने (CPC) एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जपानने  (Japan) तैवानला मदत करण्याची चूक केली तर त्यांच्यावर अणुबॉम्बने हल्ला केला जाईल. तैवानच्या प्रश्नावर बीजिंग नेहमीच आक्रमक राहिले असले तरी अशाप्रकारे अण्वस्त्र हल्ल्याची धमकी पहिलांदाच समोर आली आहे. (China is preparing for nuclear attack)

'सातत्याने सुरु आहे Attack'

'फॉक्स न्यूज' च्या (Fox News) वृत्तानुसार हा व्हिडिओ सीपीसीच्या परवानगीने एका वाहिनीवर प्ले करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, 'आम्ही आधी अणुबॉम्ब वापरू. आम्ही अणुबॉम्ब (Atom Bomb) वापरत राहू आणि जपान बिनशर्त आत्मसमर्पण करेपर्यंत आम्ही ते करत राहू. तैवान न्यूजने म्हटले आहे की, चीनी प्लॅटफॉर्म Xiguaवर 2 मिलियन व्ह्युज प्राप्त झाल्यानंतर हा व्हिडिओ हटविला गेला, परंतु व्हिडिओची एक प्रत यूट्यूब आणि ट्विटरवर अपलोड करण्यात आली आहे.

Taro Aso यांचे मोठे विधान  

चीनकडून हा धोका अशावेळी आला आहे जेव्हा दोन आठवड्यांपूर्वी जपानने तैवानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याविषयी बोलले होते. जपानचे उपपंतप्रधान तारो असो  (Deputy Prime Minister Taro Aso) म्हणाले की, जपानने तैवानचे संरक्षण केले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, तैवानमध्ये कोणतीही मोठी घटना घडल्यास जपानच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत जपान आणि अमेरिकेला तैवानच्या संरक्षणासाठी एकत्र काम करावे लागेल.

तैवान हा आमचा भाग आहे - चीन

दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन (Zhao Lijian) यांनीही एक निवेदन दिले आहे. स्काई न्यूज ऑस्ट्रेलियाच्या अहवालानुसार लिजियन यांनी असं म्हटलं आहे की, तैवानच्या प्रश्नाबाबत जपानने आपली विचारधारा बदलली पाहिजे. चिनी प्रवक्त्याने सांगितले, 'आम्ही पुन्हा एकदा जपानला तैवानच्या मुद्दय़ावर आपली विचारधारा बदलण्याचा आग्रह केला. प्रादेशिक शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी हे आवश्यक आहे. जपानने चीनच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेबद्दल आदर दर्शविला पाहिजे. झाओ लिजियन यांनी असेही म्हटले की, तैवान हा आमचा भाग आहे आणि ती पूर्णपणे चीनची अंतर्गत बाब आहे.