भारताची १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, चीनी मीडियाची धमकी

चीनच्या अधिकृत मीडियानं आज भारतावर आपला हल्ला आणखी तेज केलाय. आपापल्या संपादकीयमध्ये ही स्थिती चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच भारतीय सैनिकांना सन्मानासहीत सिक्कीम सेक्टरमधून माघार घेण्याचा न मागता सल्लाही दिलाय. 

Updated: Jul 5, 2017, 05:29 PM IST
भारताची १९६२ पेक्षाही वाईट अवस्था करू, चीनी मीडियाची धमकी

बीजिंग : चीनच्या अधिकृत मीडियानं आज भारतावर आपला हल्ला आणखी तेज केलाय. आपापल्या संपादकीयमध्ये ही स्थिती चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोबतच भारतीय सैनिकांना सन्मानासहीत सिक्कीम सेक्टरमधून माघार घेण्याचा न मागता सल्लाही दिलाय. 

चीनचं वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सनं, भारतानं धडा घ्यायला हवाय असं म्हटलंय. चीनसोबत आपल्या सीमा वादाला आणखीन हवा दिली तर भारताची स्थिती १९६२ पेक्षाही वाईट होईल, अशी धमकीच ग्लोबल टाइम्सनं दिलीय. 

भारताच्या कुरापती... 

भारताची कुरापत काढण्याची नवी पद्धत आता चिनी ड्रॅगननं स्वीकारलेली दिसतेय. सिक्कीममध्ये आपल्याच भूमीत घुसून भारतीय जवानांना धक्काबुक्की केल्यानंतर आता हिंदी महासागरामध्ये चिनी नौदलाची कुमक वाढत असल्याचं दिसतंय. संरक्षणातल्या गुप्तचरांचं यावर बारीक लक्ष आहे. 

पहिल्यांदा सिक्कीममध्ये घुसखोरी... आणि आता समुद्रामध्येही हडेलहप्पी... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदी महासागरात चीनची युआन क्लासची पाणबुडी दिसलीये. ही या प्रदेशात तैनात करण्यात आलेली सातवी पाणबुडी असल्याचं मानलं जातंय. चीनच्या या हालचालींवर भारतीय संरक्षणखात्याचा गुप्तचर विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चीन या हिंदी महासागरात सातत्यानं आपल्या नौदलाची अधिकाधिक कुमक पाठवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात चीननं ११ ते १३ नौदलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. एका युनिटमध्ये एक विनाशिका, १-२ फ्रिगेट शिप आणि एक टँकर असतो. हेरगिरीसाठी वापरण्यात येणारं जहाज हायविंग झिंगदेखील चीननं हिंदी महासागरामध्ये तैनात केलंय. 

एकीकडे सीमेवर आणि हिंदी महासागरामध्ये ड्रॅगनची दंडेली सुरू असताना राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सुटावा, अशी चीनची इच्छा आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण चीनचे भारतातले राजदूत ल्यओ झाओहुई यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. 

आता चर्चेचा चेंडू भारताच्या कोर्टात आहे. चर्चेसाठी काय मुद्दे आहेत, याचा निर्णय भारत सरकारनं घ्यायचाय. चिनी मीडियामधल्या संभाव्य युद्धाच्या चर्चेबाबत विचारलं असता झाओहुई म्हणाले की, अशा अनेक पर्यायांवर चर्चा सुरूच आहेत. आता हे तुमच्या (भारत) सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे.

१० जुलैला भारत, अमेरिका आणि जपानचा संयुक्त नौदल युद्धाभ्यासही हिंदी महासागरात होणार आहे. त्यामुळेही चीननं आपल्या हालचाली वाढवल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच आठवड्यात पंतप्रधान मोदी जी २० परिषदेसाठी जर्मनीला जाणार आहेत. त्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत भारत आणि चीन यांच्यातला तणाव टीपेला पोहचला असताना या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. प्रश्न शांततेनं सुटावा, असं चीनला खरोखर वाटत असेल तर आपल्या या युद्धखोर हालचाली त्या देशानं प्रथम थांबवल्या पाहिजेत...