नवी दिल्ली : रशियाची कोरोना विरोधी लस स्पुटनिकच्या निर्मिती आणि चाचण्यांमध्ये भारतातली डॉ रेड्डीज लॅब सहकार्य करत आहे. चाचण्या आणि वितरणात सहकार्य करार करण्यात आला आहे. एरवी संरक्षण क्षेत्रातले दोन पारंपरिक मित्र आता एकमेकांना कोरोना विरोधातल्या लढाईतही सहकार्य करणार आहेत. भारतातली अग्रगण्य डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी रशियन लस स्पुटनिकच्या वितरण आणि चाचण्यांसाठी मदत करणार आहे. तसा करार रशियन सरकार आणि डॉ. रेड्डीजमध्ये करण्यात आला आहे.
#BreakingNews कोरोनाविरोधी लढ्यात भारत आणि रशिया यांच्यात सहकार्य । भारतात डॉ. रेड्डीज करणार रशियन लशीच्या चाचण्या । स्पुटनिक 'लस'चे १० कोटी डोस डॉ. रेड्डीजना मिळणार@ashish_jadhaohttps://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/Cu8OsIh2CC
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 18, 2020
या नव्या कराराअंतर्गत भारतात परवानगी मिळाल्यास डॉ. रेड्डीजला १० कोटी डोस पुरवण्यात येणरा आहेत. रशियन स्पुटनिकच्या सध्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या वर्षाअखेर या डोसेसचा पुरवठा करण्यात येईल असं डॉ. रेड्डीजने म्हटले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचे निकाल अतिशय आश्वासक आहेत. भारतीय रूग्णांसाठी ही लस उपयोगी आहे का याची चाचणी डॉ. रेड्डीज लॅब करणार आहे. ही चाचणी तिसऱ्या टप्प्यातली असेल, असे डॉ. रेड्डीजने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
११ ऑगस्टला रशियात स्पुटनिक या जगातल्या पहिल्या कोरोनाविरोधी लशीची नोंदणी करण्यात आली होती. रशिया आणि डॉ. रेड्डीज यांचे गेल्या २५ वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे डॉ. रेड्डीजवर पूर्ण विश्वास असल्याचं रशियन लशीच्या उत्पादकांनी म्हटले आहे.