सावधान! 'या' लोकांकडूनही डेल्टा विषाणूच्या प्रसाराचा धोका

Delta variant risk : कोरोनाचा ( Coronavirus) धोका कमी होत आहे असे वाटत असताना पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे. 

Updated: Oct 30, 2021, 08:45 AM IST
सावधान! 'या' लोकांकडूनही डेल्टा विषाणूच्या प्रसाराचा धोका  title=
संग्रहित छाया

लंडन : Delta variant risk : कोरोनाचा ( Coronavirus) धोका कमी होत आहे असे वाटत असताना पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे कोविड-19च्या नियमांचे काटेकोरपणे वापर करण्याची गरज आहे. दरम्यान, कोरोना लस घेतलेल्या लोकांकडूनही 'डेल्टा विषाणू'च्या प्रसाराचा धोका असल्याचा निष्कर्ष ब्रिटनमधील संशोधनातून काढण्यात आला आहे. (Covid vaccines cut Delta variant risk but transmission in households continue, Lancet study says)

लॅन्सेट नियतकालिकात गुरुवारी प्रकाशित झालेल्या चाचणीच्या निकालांनुसार, ज्या लोकांना कोविड विरूद्ध लसीचे दोन डोस मिळाले आहेत त्यांना संसर्ग होण्याचा आणि डेल्टा प्रकाराचा प्रसार होण्याचा धोका कायम आहे. यात विशेषत: घरगुती संसर्ग जास्त असल्याचे दिसून येत आहे. तथापि, लसीकरण न केलेल्या लोकांच्या तुलनेत धोका अजूनही कमी आहे, यूकेमधील इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे. लसीकरण केलेले लोक देखील संक्रमण अधिक करतात.

लस घेतलेल्या लोकांना कोरोना होऊ शकतो. मात्र, त्याची तीव्रता ही कमी असते. समजा पुन्हा कोरोना झाला तर त्यातून ते लवकर बरे होतात. असे असले तरी लस न घेतलेल्यांप्रमाणेच ते डेल्टा विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता असते. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे. लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाची लस घेतल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनाची लस डेल्टा विषाणूवर कमी परिणामकारक ठरत आहे, असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. कोरोनाचा संसर्ग घरातील व्यक्तींपासून सर्वांत जास्त प्रमाणात होतो, असे दिसून येत आहे. असे असले तरी लस घेतलेल्या लोकांकडून किती प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होतो यावर आणखी अभ्यास होणे आवश्यक आहे, असे करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

सध्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शाळा, बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे. तसेच अमेरिकेमध्ये डेल्टा विषाणूमुळे कोरोना साथीची स्थिती आणखी गंभीर बनली. जगात अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात लसीकरण होऊनही तिथे कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोना मृत्यूचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा विषाणूला प्रतिबंध कसा करावा याकडे आता जगभरातील संशोधकाचे लक्ष लागले आहे. डेल्टा विषाणूमुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण पडला आहे. चीन पाठोपाठ आता ब्रिटनमध्येही कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.