कोरोनाला 'चीनी व्हायरस' म्हणणारे ट्रम्प बॅकफूटवर

चीनच्या वुहानमध्ये सगळ्यात पहिले सापडलेला कोरोना व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

Updated: Mar 28, 2020, 10:14 PM IST
कोरोनाला 'चीनी व्हायरस' म्हणणारे ट्रम्प बॅकफूटवर title=

मुंबई : चीनच्या वुहानमध्ये सगळ्यात पहिले सापडलेला कोरोना व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. या व्हायरसमुळे जगभरात मोठ्याप्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. संपूर्ण जगच या व्हायरसमुळे लॉकडाऊन झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हायरसवरुन अनेकवेळा चीनवर निशाणा साधला. ट्रम्प यांनी या व्हायरसचा उल्लेख चीनी व्हायरस असा केला, पण आता ट्रम्प अचानक बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. 

जी-२० देशांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चीनवर कोणतेच प्रश्न उपस्थित करण्यात आले नाहीत. एवढा कालावधी चीनने कोरोना व्हायरसकडे दुर्लक्ष का केलं? व्हायरसबाबत बोलणाऱ्या डॉक्टरचं तोंड का बंद करण्यात आलं? रुग्णांचे सॅम्पल नष्ट का करण्यात आले? परिस्थिती नियंत्रणात असल्याचं चीनने वारंवार का सांगितलं? हे प्रश्न विचारण्यात आले नाहीत.

जी-२०च्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. कोरोनाचा उल्लेख चायनीज व्हायरस करणाऱ्या ट्रम्पनी जिनपिंग यांच्यासमोर तो शब्द उच्चारलादेखील नाही. आता तर ट्रम्प यांनी चीनचं कौतुकही केलं आहे. ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात फोनवरुन चर्चा पण झाली.

'कोरोना व्हायरसबद्दल शी जिनपिंग आणि माझी चर्चा झाली आहे. चीन खराब परिस्थितीमधून जात आहे. चीनला व्हायरसबाबत समज आहे. अमेरिका आणि चीन मिळून काम करत आहेत,' असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे.

एका आठवड्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी किमान १० वेळा कोरोना व्हायरसवरुन चीनचं नाव घेतलं होतं. याला चायनीज व्हायरस म्हणण्यात गैर काय? असं ट्रम्प म्हणाले होते. आता मात्र ट्रम्प यांची भूमिका बदललेली पाहायला मिळत आहे.

चायनीज व्हायरसवरुन जिनपिंग यांनी नाराजी व्यक्त केली का? चीनने व्हायरसबाबत आधीच माहिती दिली असती, तर अनेकांचे प्राण वाचले असते, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारला गेला. पण जिनपिंग यांच्याशी याबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

जी-२०च्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचं मत मांडलं. 'वैश्विकरणाने आम्हाला अयशस्वी केलं, मग ते दहशतवाद असो किंवा जलवायू परिवर्तनाचा सामना करणं असो. जी-२० देखील आर्थिक हितांवर लक्ष देणारं व्यासपीठ झालं. यावेळी आम्हाला आर्थिक हितांऐवजी माणुसकीवर लक्ष दिलं पाहिजे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली पाहिजे. वैश्विकरणाच्या नव्या संकल्पनेकडे बघण्याची संधी कोरोनाने जगाला दिली आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.