Hunter Biden Laptop Photos Leaked: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे पुत्र हंटर बायडन यांच्या (Hunter Biden) लॅपटॉपमधील 9000 हून अधिक फोटो लिक झाले आहेत. उजव्या विचारसणीच्या मार्को पोलो ग्रुपने हे फोटो सार्वजनिक केले आहेत. यामध्ये हंटर बायडन हे अंमली पदार्थांचे सेवन करतात, शरीरविक्रेय करणाऱ्या महिलांबरोबर नग्नावस्थेत दिसत आहेत. तसेच हंटर यांच्या लॅपटॉमधील काही कौटुंबिक फोटोही या ग्रुपने लिक केले आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपने एक वेबसाईट सुरु करुन त्यावर हे फोटो अपलोड केले आहेत. बायडन लॅपटॉप मिडिया डॉट कॉम असं या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर एकूण 8,864 फोटो अपलोड करण्यात आले आहेत. हंटर बायडन यांच्या जुन्या लॅपटॉपमधून हे फोटो या ग्रुपने मिळवले आहेत. यात अश्लील फोटोंबरोबरच बायडन कुटुंबियांचेही फोटो आहेत.
हंटर बायडन यांनी हा लॅपटॉप रिपेअर करण्यासाठी दिला होता. मात्र नंतर ते याबद्दल विसरुन गेले. तर दुसरीकडे अनेक महिने हा लॅपटॉप घ्यायला कोणी आलं नाही म्हणून दुकानदाराने यामधील डेटा तपासून पाहिला. डेटा संवेदनशील असल्याने या दुकानदाराने एफबीआयला संपर्क केला. मात्र हा डेटा एफबीआयला देण्याआधी त्याची एक कॉपी बनवून घेण्यात आली. याच कॉपीमधून हा डेटा लिक झाल्याची शक्यता आहे.
हंटर बायडन यांचे खासगी फोटो व्हायरल झाल्याचं वृत्त ब्रिटनमधील 'डेली मेल'ने दिलं आहे. हा वृत्तानुसार हे सर्व फोटो 2008 ते 2019 दरम्यानचे आहेत. हे फोटो चीन, लंडन, पॅरिस, रोम, हवाई बेटे, काबो सान लुकास, कोसोवो यासारख्या ठिकाणी काढण्यात आले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंपैकी 7 हजार 32 फोटो हे हंटर बायडन यांच्या मॅकबूक प्रो आयफोटो अॅपमधून लिक झालेले आहेत. त्याचप्रमाणे हंटर बायडन यांच्या आयफोन एक्सएसच्या बॅकअपमधून 1,832 फोटो, 428 लाइव्ह फोटो, टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवण्यात आलेले 674 फोटो, 579 स्क्रीनशॉट आणि 40 व्हॉट्सअप फोटोंचा समावेश आहे. अन्य 111 फोटोंचाही यात समावेश आहे.
मार्को पोलोने हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधील अश्लील फोटोंबरोबरच त्यांचे बँक स्टेटमेंट, क्रेडिट कार्ड, सोशल सिक्युरिटी नंबर आणि अन्य संवेदनशील माहिती काढून टाकली आहे. हंटर बायडन यांच्या लॅपटॉपमधील या फोटोंमुळे बायडन यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मार्को पोलोची स्थापना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये व्हाइट हाऊसमध्ये काम करणारे कर्मचारी गॅरेट जिग्लर या 28 वर्षीय तरुणाने केली आहे.
भ्रष्टाचार आणि ब्लॅमेलिंगविरोधात लढणारा हा ना नफा ना तोटा पद्धतीने हा गट काम करतो असा दावा मार्को पोलोने केला आहे. "अमेरिकेतील फर्स्ट फॅमेली (राष्ट्राध्यक्षांचं कुटुंब) कसं आहे हे लोकांना जाणून घ्यायचं असेल तर ते लोक हे पाहू शकतात," असं जिग्लर यांनी म्हटलं आहे. अश्लील फोटो एडीट करण्यासाठी आम्हाला 2 महिन्यांचा कालावधी लागला असंही मार्को पोलोकडून सांगण्यात आलं.