तेहरान : इस्लामी गणतंत्र असलेल्या इराणवर कोणतीही कारवाई केलीत, तर परिणाम भोगायला तयार राहा, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. दक्षिण-पश्चिम आशियाच्या सशस्त्र बलाच्या जनरल स्टाफचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अबुलफजल शेकरची तसनीम समाचार एजन्सीला म्हणाले, 'इराणच्या दिशेने एकही गोळी चालली तर अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नुकसानाला सामोरं जावं लागेल.'
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आसन्न हल्ल्याबाबत कोणताही इशारा दिल्याचं इराणने फेटाळून लावलं. इराणने खूप मोठी चूक केली, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांनी इराणला हा इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते केयवान खोसरवी म्हणाले, 'अमेरिकेने इराणला ओमानमधून कोणताही असा संकेत दिलेला नाही.' राष्ट्रीय टेलिव्हिजन चॅनलवर बोलताना यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खोसरवी यांनी सांगितलं.
इराणवर हल्ला करण्याची आम्हाला कोणतीही घाई नसल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. अमेरिकेचं लष्कर प्रत्युत्तर देण्यासाठी तयार होतं, पण मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली असती, त्यामुळे आम्ही जवानांना परत बोलावलं, असा दावा ट्रम्प यांनी केला. हवाई क्षेत्राचं उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेचं ड्रोन पाडल्याची माहिती गुरुवारी इराणने दिली होती.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची भीती आहे. याबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री खालिद-अल-फलिह यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. ओपेक देशांत प्रमुख सदस्य असलेल्या सौदीला तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्याबाबत सक्रीय भूमिका निभावण्याची विनंती यावेळी प्रधान यांनी केली. भारत तेलाबाबत ८३ टक्के आयातीवर अवलंबून आहे. यावेळी चर्चेदरम्यान प्रधान यांनी होरमूज स्ट्रेटबाबत चिंता व्यक्त केली.