पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी भन्नाट जुगाड! जिओइंजिनिअरिंगचा होणार वापर

पृथ्वीचं तापमान सातत्यानं वाढतंय. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागलाय. पृथ्वीला थंड करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवी युक्ती शोधून काढली. 

Updated: Mar 16, 2024, 08:18 PM IST
 पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी भन्नाट जुगाड! जिओइंजिनिअरिंगचा होणार वापर title=

Earth Temperature : पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय. वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाची समस्या गंभीर बनत चाललीय. अशातच पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी संशोधक शर्थीचे प्रयत्न करतायेत. अमेरिकन शास्त्रज्ञांनी याबाबत नवी युक्ती शोधून काढलीय. ज्यामध्ये पृथ्वीच्या वरचं वातावरण कोरडं करण्याची योजना आहे. 

वातावरणात असलेले बाष्पाचे कण कोरडे करणार

विज्ञानानुसार जलबाष्प म्हणजेच वायू स्वरूपातील पाणी हा एक नैसर्गिक वायू आहे जो उष्णता वाढू देत नाही. कोळसा, तेल किंवा वायू जाळल्यावर कार्बन डायऑक्साईडवायू जसा निघतो, त्याप्रमाणेच तो काम करतो. त्यामुळे अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या संशोधकांनी वरच्या वातावरणात असलेले हे बाष्पाचे कण कोरडे करण्याची योजना आखलीय. 

सायन्स ऍडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात शास्त्रज्ञांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीय. वातावरणातील त्या भागात बर्फ सोडण्यात येईल. जेणेकरून तो भाग थंड होईल. मानवी कृतींमुळे जी उष्णता निर्माण होते ती उष्णता हा भाग शोषून घेईल. यालाच जिओइंजिनीअरिंग असं म्हंटलं जातं. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीचं तापमान इतकं वाढलय की, ते कमी करण आता जवळजवळ अशक्य आहे. भूअभियांत्रिकीच्या अनेक पद्धती यापूर्वी उदयास आल्या असल्या, तरी त्यांच्याशी निगडित धोक्यांमुळे त्या नाकारल्या गेल्या आहेत. कार्बन प्रदूषण कमी करण्यासाठी भूअभियांत्रिकी हा पर्याय असू शकत नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

मात्र, नव्या कल्पनेनुसार एक अत्याधुनिक विमान पृथ्वीपासून सुमारे 17 किलोमीटर उंचीवर, म्हणजे स्ट्रॅटोस्फियरच्या अगदी खाली हवेत बर्फाचे कण सोडेल. या उंचीवर हवा हळूहळू वरच्या दिशेनं जाते. जिथे बाष्पाचे कण असतील. त्यांचं रूपांतर बर्फात होईल आणि स्ट्रॅटोस्फियरचं तापमान कमी होईल. मात्र काही शास्त्रज्ञांनी अशा प्रकारे वातावरणाशी छेडछाड करण म्हणजे नवीन समस्यांना आमंत्रण देण्यासारखं आहे असं म्हंटलंय. शास्त्रज्ञांच्या कल्पनेतील अभियांत्रिकीचा भाग समजण्याजोगा आहे, मात्र हे संपूर्ण प्रकरण एखाद्या बालकथेसारखं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.