हिंदू समाजाला कोणावरही वर्चस्व गाजवायचे नाही- मोहन भागवत

हिंदू आपल्या मूळ सिद्धांताचे पालन करण्यास विसरले आहेत.

Updated: Sep 8, 2018, 04:49 PM IST
हिंदू समाजाला कोणावरही वर्चस्व गाजवायचे नाही- मोहन भागवत

शिकागो: एखाद्यावर वर्चस्व गाजवणे ही हिंदू समाजाची महत्त्वकांक्षा नाही, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते शनिवारी शिकागो येथील जागतिक हिंदू काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. सर्वजण एकत्र आल्यासच हिंदू समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो, असे भागवत यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला हिंदू समाजातील जवळपास २५०० नेते उपस्थित होते. अहंकाराला वेसण घातली आणि सर्वानुमतीने गोष्टी स्वीकारल्या तर संपूर्ण जगाला एकत्र आणता येणे शक्य आहे. सिंह एकटा असेल तर कुत्रेही त्याच्यावर हल्ला करुन त्याला ठार मारू शकतात. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला हे जग आणखी चांगले करायचे आहे. आपल्यात वर्चस्ववादाची भावना नाही, असे भागवतांनी म्हटले. 

हिंदू आपल्या मूळ सिद्धांताचे पालन करण्यास विसरले आहेत. ते अध्यात्मिकताही विसरले आहेत. त्यामुळे हजारो वर्षांपासून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे हिंदुंनी आता एकत्र यायला हवे. त्यांना एकत्र यावेच लागेल, असेही भागवतांनी सांगितले.